कोल्हापूर : जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाचे असहकार्य यामुळे शहरातील पार्किंगचा फज्जा उडाला आहे. महापालिकेने पार्किंग व्यवस्था न पाहताच परवानगी दिली आहे. पोलीस प्रशासनास कारवाईचे अधिकार द्या; सर्व रस्ते रिकामे करून दाखवितो, अशा कानपिचक्या पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शुक्रवारी महापालिका बैठकीत दिल्या. ‘पोलिसांचे कोणी हात धरलेले नाहीत. आम्ही सहकार्यास तयार आहोत,’ असे प्रत्युत्तर नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले.एस. टी. प्रशासनाकडे सहा महिने पाठपुरावा करीत कोकणात जाणाऱ्या गाड्या संभाजीनगर स्टॅँडमधून सोडण्यात आल्या. मात्र, आंदोलनाच्या धास्तीने पुन्हा मार्गात बदल झाला. भवानी मंडपातील पार्किंगचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणाचा काही भाग देण्याचे ठरले. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनेही आता हात वर केले. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेस मदत करताना आम्हीही विचार करू. मंगल कार्यालये व हॉस्पिटल्स्चे पार्किंग रस्त्यावर होते. महापालिका कारवाई करणार नसेल, तर आम्हास अधिकार द्या, आम्ही कारवाई करतो, अशा शब्दांत शर्मा यांनी महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाला फटकारले. महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे कारवाई करण्याचे यावेळी ठरले. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांचे कोणी हात धरलेत काय ?
By admin | Updated: February 13, 2015 23:56 IST