लोकमत न्यूज नेटवर्क
किणी : किणी (ता. हातकणंगले) येथे महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक तीन दिवस ठप्प झाली होती. नदी अथवा ओढा जवळपास नसतानाही केवळ चौपदरीकरणातील त्रुटींमुळे शेतामध्ये साचून राहणारे पावसाचे पाणी टोलनाक्याजवळ महामार्गावर आल्याने वाहनधारकांना फटका बसला.
कागल ते सातारा चौपदरीकरण राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले. मात्र, सुरुवातीपासून विविध कारणांनी असुविधांचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख बनली आहे. त्यापैकी पाणी निर्गती ही एक प्रमुख समस्या आहे. चौपदरीकरण करतेवेळी नैसर्गिक ओघळी, नाले बुजविण्यात आले, मात्र पाणी निर्गतीसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गेली अनेक वर्षे किणी टोल नाक्याजवळील शेतामध्ये पावसाळ्यात पाणी साचून राहत आहे. यामुळे शेती नापीक होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे तर शेतकऱ्यांना मोटरच्या साह्याने पाणी बाहेर काढावे लागते. याबाबत अनेक वर्षे शेतकरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे व देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कंपनीकडे निवेदन देऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांची कोणतीही दखल घेतली गेली नाही. मात्र, २०१९ साली महामार्गावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. मात्र, यावर्षी जवळपास नदी किंवा ओढा नसतानाही किणी टोल नाक्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास तीन ते चार फूट पाणी साचून महापुरासारखी परिस्थिती निर्माण होऊन तब्बल दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही महापुरांवेळी महामार्गावर पाणी आल्याने पाणी निर्गतीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा किणी टोल नाक्यावरील पाण्यामुळे प्रत्येक वर्षी वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
चौकट .. चौपदरीकरणानंतर नैसर्गिक ओघळी, नाले बुजल्यामुळे टोल नाक्याजवळील शेतीमध्ये अनेक वर्षे पाणी साचून राहते. मात्र, आता महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होत असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
.
चौपदरीकरणानंतर महामार्गालगतच्या शेतामध्ये पावसाळ्यात गेली पंधरा-सोळा वर्षे पाणी साचून शेती नापीक बनली असून, याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, आजअखेर याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे. पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी अशोक दणाणे (किणी) यांनी केली आहे.
.
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्याजवळील शेतामध्ये पावसाचे पाणी साचून महामार्गावर आल्याने बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली होती.
पावसाचे शेतामध्ये साचणारे पाणी महामार्गावर आल्याने किणी टोलनाक्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.