कोल्हापूर : पाणीपट्टीची १० हजार रुपयांवरील थकबाकी असणारे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रडारवर आहेत. अशा ११ हजार ३८३ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांपैकी ८० कनेक्शनही तोडली आहेत. पुढील साडेतीन महिन्यांमध्ये वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर वसुली मोहीम सुरू आहे.
महापालिकेच्या वतीने ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर पाणीपुरवठा विभागाकडून सेवा दिली जाते. मात्र, काहींकडून वेळच्या वेळी पाणीपट्टी जमा केली जात नाही. अशांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. यासाठी पाच पथके तैनात केली आहेत. यामध्ये एक मीटर रीडर, एक वसुली प्रमुख, एक साहाय्यक, दोन फिटरचा समावेश आहे. त्यांच्याकडून ८० कनेक्शन तोडण्यात आली असून एक कोटींची थकबाकी वसूल केली आहे.
चौक़ट
स्पॉट कलेक्शनमधून दोन कोटींची वसुली
गेल्या नऊ महिन्यांत स्पॉट बिलिंग आणि स्पॉट कलेक्शनचा ११ हजार ग्राहकांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून दोन कोटी २० लाखांची वसुली झाली आहे. मशिनरी, साहित्य अपुरे असल्यामुळे सर्वच प्रभागांत याची अंमलबजावणी होत नाही.
सवलतीचाही वसुलीवर परिणाम
मागील वर्षी महापुराच्या काळातील संबंधितांना ५० टक्के सवलत दिली होती. या वर्षी कोरोनामुळे व्यापाऱ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे व्याज; तर एप्रिल ते मेचे ५० टक्के पाणी बिल माफ केले. यामुळेही काही अंशी वसुलीवर परिणाम होत आहे.
चौक़ट
एकूण पाणी कनेक्शन : एक लाख दोन हजार ४५०
घरगुती कनेक्शन : ९९ हजार ४५४
व्यापारी : १६२५
औद्योगिक : १३७१
पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट : ६८ कोटी ५० लाख
वसुली : २४ कोटी ५२ लाख
प्रतिक्रिया
महापूर, कोरोनाचा विचार करून थकबाकीदारांचे कनेकशन तोडणे अथवा जप्तीची कारवाई तातडीने केली जात नाही. थकबाकी जमा करण्यासाठी त्यांना तीन ते चार हप्ते देतो. तरीही कोणी पैसे जमा केले नाही तर मात्र, कनेकश्न तोडणे आणि जप्तीची कारवाई केली जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात किरकोळऐवजी १० हजार रुपयांवरील थकबाकीदारांच्या वसुलीला प्राधान्य दिले आहे.
प्रशांत पंडत, पाणीपट्टी अधीक्षक, महापालिका