राजाराम कांबळे ल्ल मलकापूरछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि गर्दी, गडबड नसलेला निसर्गरम्य निवांत परिसर म्हणजे विशाळगड. विशाळगडावरील वास्तव्य एक वेगळीच अनुभूती देते. मात्र, हा परिसर वेगळ्याच कारणांनी प्रसिद्धीस येत असल्याने येथील जाज्वल्य इतिहास विस्मृतीत जाऊ लागला आहे.सह्याद्रीच्या मुख्य रांगेत जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर विशाळगड हा किल्ला वसलेला आहे. या गडाचे पूर्वीचे नाव ‘खेळणा’ होते. याची भव्यता आणि दुर्गमता पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे ‘विशाळगड’ असे नामकरण केले. अभेद्य असणाऱ्या या किल्ल्याचे आता बुरूज व तटबंदी ढासळू लागले आहेत. किल्ल्याचे जुने वैभव नष्ट होत आहे. येथील पुराणकालीन मंदिराचीही दुरवस्था झाली आहे. शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला राजवाड्यांच्या भिंतींचा सांगाडा उभा आहे, तर बाजूलाच असलेली शिवकालीन विहीर बुजण्याच्या स्थितीत आहे. येथील नागरिकांनी शिवकालीन भूपाळतळे बुजवून त्यावर अतिक्रमण करून शेती केली आहे. येथील छोटे-मोठे पाण्याचे झरे नागरिकांनी ताब्यात घेऊन अतिक्रमण करून पाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.विशाळगडाच्या दर्शनी भागी मुंडा दरवाजा भग्नावस्थेत असून, दरवाजाचे दगड निखळू लागले आहेत. दरवाजापुढे सात फुटांवर दरीचा भाग सुरू होतो. दरीकडील बाजूस लोखंडी ग्रील बसवून दरवाजाची डागडुजी करणे गरजेचे आहे. दरवाजावर झाडे-झुडपे उगवली आहेत.गडाच्याभोवती असणारे बुरूज ढासळू लागले आहेत. हे ठिकाण प्रेमीयुगुलांचा अड्डा बनू पाहत आहे. बाजीप्रभू व फुलाजी देशपांडे बंधूंच्या समाधीस्थळाची दुरवस्था झाली आहे. गडावर चढण्यासाठीच्या लोखंडी शिडीचे पाय गंजून तुटले आहेत. यावरून आपला जीव धोक्यात घालून भाविक व पर्यटक गडावर जातात. तेथील पुलाचे बांधकामही रखडले आहे. गडावर शिवकालीन तोफ भग्नावस्थेत आहे. पाण्याची सोय नाही. विश्रामगृह नाही, त्यामुळे खासगी लॉजमध्ये थांबावयास भाग पडते. सर्वत्र अस्वच्छता आहे. दररोज ग्रामपंचायत स्वच्छता करीत नाही. शासकीय जागेत नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे संपूर्ण गडाचे पावित्र्य धोक्यात आहे.गडाच्या विकासासाठी पर्यटन विकास आराखडा शासनाच्या लाल फितीत अडकून आहे. पर्यटन विकास महामंडळाने विचारविनिमय करून गडावर भाविक व पर्यटकांसाठी धर्मशाळा, शौचालय, तसेच धोकादायक ठिकाणी सुरक्षा भिंतीसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. गडावरील मंदिरे, शिवकालीन राजवाडा यांची डागडुजी, मुंडा दरवाजा, बुरुजांची डागडुजी करणे गरजेचे आहे.पर्यटक, भाविक यांना गडाची माहिती होण्यासाठी फलकाची आवश्यकता आहे. गडावर येणाऱ्या पर्यटक व भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी गडावर वणवण भटकावे लागते. यासाठी शासनाने कायमस्वरूपी मोठी पाणी योजना राबविणे गरजेचे आहे.
विशाळगडचा इतिहास जातोय विस्मृतीत
By admin | Updated: July 10, 2014 01:01 IST