सदाशिव मोरे।
आजरा : जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे आजरा तालुक्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वृक्षलागवडीप्रमाणे जंगलसंवर्धनाची गरज आहे. जंगलसंवर्धनासाठी नागरिकांच्या प्रबोधनाचीही गरज आहे. जंगलातील आगीमुळे जंगली जनावरांचा चारा, पशू, पक्षी, प्राणी, कीटक व त्यांचा अधिवास होरपळून जात आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे व अतिसंवेदशील असणारे आजरा तालुक्यातील जंगल आगीमुळे नष्ट होत आहे.
वृक्षलागवडीबरोबर जंगलसंवर्धनाची लोकचळवळ उभी राहिली, तरच यापुढील काळात नागरिकांना मोकळा श्वास मिळणार आहे. जैवविविधता व निसर्गसौंदर्याने नटलेला आजरा तालुक्यातील परिसर आहे. भारतीय उपखंडात आढळणाऱ्या वनस्पतींपैकी ६९४ प्रजाती आजऱ्याच्या जंगलात सापडतात. सस्तन प्राण्यांच्या ४० पेक्षा जास्त प्रजाती व २,२२७ सपुष्प वनस्पतींच्या नोंदी आहेत. ६० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.
हिरडा, ऐन, जांभूळ, दालचिनी, साग, आंबा, चंदन, सिसम, किंजळ, रानबाबूळ, खैर या वृक्षसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हत्ती, गवे, अस्वल, वाघ, बिबट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा यासारखे जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत.
सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता व जंगलांना लावली जाणारी मानवनिर्मित आगीमुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगलांचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन केले जात आहे. मात्र, आजरा तालुक्यातील १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील जैवविविधता मानवनिर्मित आगीत भस्मसात होत आहे, असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या नागरिकांवर वन विभागांकडून कारवाईची गरज आहे.
फेब्रुवारी ते मेअखेर वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये कर्मचारी, वाढविणे, वनमित्रांची मदत घेऊन लागलेली आग तातडीने नियंत्रित आणणे, आग विझविण्यासाठी ब्लोअरचा वापर करणे, पाण्याच्या टँकरची उपलब्धता करणे गरजेचे आहे. आगीमुळे सरपटणारे प्राणी होरपळतात, तर काही प्राणी जायबंदी होऊन मृत्युमुखी पडतात. वणव्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते.
भविष्यकाळात मोकळा श्वास घेता यावा यासाठी जंगलसंवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे. आगीमुळे जंगलातील वृक्षसंपदेबरोबर खाजगी मालकीतील वृक्षसंपदाही नष्ट होत आहे.