कोल्हापूर : सरकारी रुग्णालये तसेच महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासमोर लागणाऱ्या लांबलचक रांगा, रांगेत होणारी गर्दी आणि या गर्दीमुळे होणारा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पैसे मोजून खासगी रुग्णालयाकडे लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे खासगी रुग्णालयात लस घेण्याने नागरिकांचा वेळही वाचतो, हेलपाटे मारावे लागत नाहीत.
राज्य सरकारतर्फे जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या नागरी आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. परंतु याठिकाणी राज्य सरकारकडून कधी लस मिळणार आणि किती डोस मिळणार, याची नेमकी माहिती कोणालाच असत नाही. त्यामुळे भल्या मोठ्या रांगेत उभे राहून प्रतीक्षा करणे एवढेच नागरिकांच्या नशिबी आले आहे.
जिल्हा परिषद व महानगरपालिका लसीकरण मोहीम मोफत राबविली जाते; परंतु खासगी रुग्णालयात मात्र फी आकारली जात आहे. पैसे देऊन लस मिळत असल्याने सर्वसामान्य नोकरदार तसेच उच्चभ्रू, व्यावसायिक, उद्योजक यांच्या दृष्टीने ती उपयोगी पडत आहे. खासगी रुग्णालयांनी सोय केल्यामुळे नागरिकांना रांगेत थांबण्याची कटकट नाही. संसर्गाचा धोका नाही; पण लस घेण्याचा कल वाढत असल्याने खासगी रुग्णालयातही आता वेटिंग वाढत चालले आहे.
असे आहेत लस एका डोसचे दर
कोविशिल्ड : ७८०
कोव्हॅक्सिन : १२००
स्पुतनिक : ११४५
- आतापर्यंतचे लसीकरण -
- पहिला डोस - १०,१६,०३१
- दुसरा डोस - ०४,१४,७६३
- खासगी रुग्णालयातील आकडे काय सांगतात -
१. ॲस्टर आधार - ३१४५ (१३ हजार ३६३ वर्कप्लेस)
२. क्रोम हॉस्पिटल - ४७०९
३. ॲपल हॉस्पिटल - ४६६
४.सनराईज - १२३५
५. सचिन हॉस्पिटल - २००८
एकूण - २४ हजार ९२६
- खासगी रुग्णालयात जाण्याची कारणे
- भल्या पहाटे जाऊन रांगेत थांबणे अशक्य असते.
- ऑनलाईन राजिस्ट्रेशन करताना अडचणी येतात.
- रांगेत थांबणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
- वेळ, पैसा वाचतो, संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.
लसीकरणासाठी जाऊन कोरोना आणणे परवडत नाही. (चौकट)
सरकारी आरोग्य केंद्रावर सरसकट सर्वांना मोफत लस दिली जात असल्याने गर्दी प्रचंड होत असते. त्यामुळे अशा गर्दीतील कोणी तरी कोरोनाबाधित असला तर त्याच्यापासून इतरांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोफत लसीकरणाकडे जाऊन विकतचा कोरोना आणणे परवडणारे नाही.
प्रतिक्रिया - १
पहिला डोस घ्यायचा होता, परंतु सरकारी ॲपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत नव्हते. शेवटी खासगी रुग्णालयाकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. तेथे गेल्यानंतर लगेच लस मिळाली. खासगी रुग्णालयात पैसे द्यावे लागले असले तरी लगेच लस मिळाली.
-कौशिक कुलकर्णी, महादेवनगर
प्रतिक्रिया -२
खागसी रुग्णालयातील एक मित्राच्या ओळखीने लस घेण्यास गेलो. त्याने आधीच नोंदणी करून ठेवल्यामुळे जास्त काही धावपळ करावी लागली नाही. अगदी सहजपणे लस मिळाली.
-रोहित पाटील, बाचणी, ता. करवीर