समीर देशपांडे --कोल्हापूर -कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजता’चा प्रयोग रंगणार आहे. चिन्हांचा गोंधळ आणि नंतरचा घोडेबाजार रोखण्यासाठी आतापासूनच एकमेकांना पूरक भूमिका घेत हा प्रयोग रंगणार आहे. त्यामुळेच भाजपमध्ये यायचे नसेल तर ‘ताराराणी आघाडी’ किंवा ‘जनसुराज्य’मध्ये जावा, असा उघड सल्ला दिला जात आहे.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असणारे मंत्री पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी चांगले नियोजन लावले; परंतु ते थोडक्यात चुकले. शिवसेना सोबत असती तर आता महापालिकेवर युतीचा झेंडा फडकला असता. आता जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्यासाठी दादा आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीपासून बेरजेचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाडिक यांची ताराराणी आघाडी सोबत असतानाही विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ला सोबत घेण्यात दादांना यश आले. आजऱ्यातून अण्णा-भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी, गडहिंग्लजमधून डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, चंदगडमधून गोपाळराव पाटील, कागलमधून शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे, राधानगरीमधून जगदीश लिंग्रज, शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडी, अशोक माने, हातकणंगलेमध्ये डॉ. अशोक चौगुले, गगनबावड्यात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे अशी अनेक मंडळी भाजपसमवेत आणली गेली आहेत. काहीजण प्रवेश मार्गात आहेत. हातकणंगले तालुक्यातील वजनदार नेते अरुण इंगवले याच आठवड्यात जाहीर प्रवेश करत आहेत. केवळ भाजप-भाजप म्हणत बसलो तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मर्यादा आहेत याची जाणीव दादांना आहे. अशात ग्रामीण भागात शिवसेनेचे पाच आमदार असले तरी सेना भाजपसोबत येईल असे सध्याचे चित्र नाही. म्हणूनच महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीला सोबत घेणे, ‘जनसुराज्य’ला साथीला घेणे अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या विरोधात ताकद वाढविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्यांना भाजपमध्ये येण्यासाठी अडचण आहे, त्यांना ताराराणी आघाडी किंवा जनसुराज्यचा पर्याय दिला जात आहे. त्यातून दोन गोष्टी साध्य होणार आहेत. एकतर तालुक्या-तालुक्यांत अशा महाआघाड्या करून गोंधळ वाढवून घेण्यापेक्षा या स्थानिक आघाड्या ‘भाजता’पैकी कुणाकडेही विलीन करून मर्यादित चिन्हे घेता येतात तसेच नंतरचा घोडेबाजार रोखण्यासाठी चिन्हांवर झालेली निवड पूरक ठरू शकते. कोणत्याही परिस्थितीत ६७ पैकी महाआघाडी म्हणून ५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून सध्या नियोजन सुरू असून, त्याचाच भाग म्हणून तालुक्यात जाऊन मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे....म्हणूनच महाआघाडी ‘ताराराणी’मध्ये अण्णा-भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, सभापती विष्णुपंत केसरकर यांनी आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला सोबत घेऊन महाआघाडी केली होती. तिथे यश मिळाल्याने आता चराटी यांनी भाजपमध्ये यावे असा दबाव सुरू झाला; परंतु स्थानिक परिस्थिती पाहून चराटी थेट भाजपमध्ये सहभागी होणार नाहीत. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार भाजप नसेल तर मग जनसुराज्य किंवा ताराराणीचा पर्याय बघा, असे सांगितल्यानंतर ही आघाडी ‘ताराराणी’मध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला.सुसूत्रता राखण्यासाठी पूरक भूमिकाप्रत्येक तालुक्यातील असंतुष्टांना एकत्र करून दोन्ही काँग्रेसविरोधात लढविण्याचा प्रयोग जरी यशस्वी झाला, तरी निवडणुकीनंतर अटीतटीच्या प्रसंगात माणसे ताब्यात ठेवणे अतिशय अवघड होते. त्यांना एकदा चिन्हाच्या कायदेशीर बंधनात अडकविले की मग विजयी सदस्य दुसरीकडे जाऊ शकत नाही, तसेच प्रचारासाठी, चिन्हासाठी समान पक्ष किंवा आघाडी सोयीची ठरते. याचा विचार करूनच एक तर भाजपमध्ये या, नाही तर ताराराणी, जनसुराज्यमध्ये जावा, अशी भूमिका घेतली जात आहे.
जिल्हा परिषद सत्तेसाठी आता ‘भाजता’चा प्रयोग
By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST