लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना बळकट आहेच, तरीही अधिक सक्षम करुन संपर्क अभियानाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने १२ ते २४ जुलैपर्यंत राज्यात ‘शिवसेना संपर्क अभियान लक्ष्य २०२२’ हे अभियान सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते.
संजय पवार म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या पावणे दोन वर्षात राज्यातील सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय घेतले. कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवत जनतेला आधार देण्याचे काम केले. राज्य सरकारचे जनहिताचे निर्णय घरोघरी पोहचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागायचे आहे. पक्ष सदस्य नोंदणीसह मतदान नोंदणीही मोठ्या प्रमाणात करायची आहे.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील, विनायक साळोखे, सुरेश साळोखे, शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, मंजीत माने, राजू यादव, विशाल देवकुळे, विनोद खोत, विराज पाटील, बाजीराव पाटील, अतुल साळोखे, स्मिता सावंत, पूजा शिंदे, वंदना पाटील, भारत भापकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : शिवसेनेच्या वतीने १२ ते २४ जुलैपर्यंत राज्यात ‘शिवसेना संपर्क अभियान लक्ष्य २०२२’ हे अभियान सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मार्गदर्शन केले. (फोटो-१००७२०२१-कोल-शिवसेना)