* प्रशासनाचे योग्य व्यवस्थापन
शुभम गायकवाड : उदगांव ‘माझी वसुंधरा’ योजनेसाठी उदगांव गावची निवड झाली आहे. या योजनेसाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने उद्दिष्ट ठरवून दिले असून त्याप्रमाणे नियोजन आखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायत व तरुण संघटनांनी कंबर कसली आहे. राज्यातील मोठ्या गावांची निवड केली असल्याने त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या योजनेसाठी प्रथमत: समिती नेमली असून त्या माध्यमातून विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये प्रामुख्याने स्वच्छतेवर भर दिला असून भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन करणे, जमिनीची धूप थांबविणे, ऊर्जा बचत करणे यासंबंधी उद्दिष्ट तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार गुणांकन देण्यात येणार आहे. गावातील मानसमित्र फौंडेशन, ड्रीम फौंडेशन यासारख्या सामाजिक संस्थांनी हिरिरीने सहभाग घेतल्याने या स्पर्धेत आम्हीच जिंकू, अशी अपेक्षा तरुण मंडळींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
चौकट -
सोशल मीडियाचा योग्य वापर या योजनेसाठी व्हॉट्स अॅपवर ग्रुप तयार करण्यात आला असून गावातील अडचणी थेट त्यावर टाकण्यात येतात. तत्काळ त्यावर मार्ग काढून त्याचेही छायाचित्र ग्रुपवर टाकण्यात येत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
कोट - अशाप्रकारच्या योजनेत पहिल्यांदाच उदगांव सहभागी होत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन काम करू व योजनेत यशस्वी होऊ.
- सुहास उदगावे, उपाध्यक्ष, मानसमित्र फौंडेशन
कोट - ही योजना गावाचा चेहरामोहरा बदलून टाकणार असून त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. त्यामुळे सर्वांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे.
- रायसिंग वळवी, ग्रामविकास अधिकारी उदगांव