करवीर तालुक्यातील ४९ गावांच्या मतमोजणीची जय्यत तयारी.
** ३४ टेबलांवर होणार मतमोजणी.
**दुपारच्या आत विजयाचा गुलाल समजणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर तालुक्यातील ४९ गावांची मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी शीतल भामरे-मुळे यांनी जय्यत तयारी केली आहे. याला व्होटिंग मशीनमुळे गती मिळणार आहे. काही मिनिटांत विजयाचा गुलाल कोणावर पडणार आहे याची माहिती मिळणार आहे. ही मतमोजणी कोल्हापूर रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये उद्या, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये ३६ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकावेळी ३४ प्रभागांची मतमोजणी होणार आहे. करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ५५८ जागांपैकी ७८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ४९ गावांतील २०५ प्रभागातून ४८० ग्रामपंचायत सदस्य निवड होणार आहे. यासाठी ११७१ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी ८८.२३ टक्के एवढे मतदान झाले असून, ५३ हजार ३६९ स्त्री, तर ५९ हजार २१४ पुरुष अशा १ लाख १२ हजार ५८३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. ४९ ग्रामपंचायतींसाठी सहा फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. व्होटिंग मशीन असल्याने प्रत्येक गावांचा निकाल काही मिनिटांत मिळणार असून, कोणाची सत्ता येणार आहे हे कळणार आहे. काही व्यत्यय नाही आला, तर दुपारच्या आतच सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत.
//फेरीनुसार गावांंची नावे पुढील प्रमाणे//
१) पहिली फेरी - आडूर, भामटे, आमशी, कोपार्डे, कोगे, कळंंबे तर्फे कळे, गाडेगोंडवाडी, बाचणी पाटेकरवाडी व म्हालसवडे
२) दुसरी फेरी - कुडित्रे, गर्जन, वाडीपीर, महे, घानवडे, हळदी, देवाळे, तेरसवाडी, पडवळवाडी, रजपूतवाडी
३) तिसरी फेरी - कुर्डू, येवती, बेले, कुरुकली, कोथळी, सडोली खालसा, भुयेवाडी, खेबवडे, वडकशिवाले
४) चौथी फेरी - केर्ली तामगाव, बालिंगा, पाडळी खुर्द, शिंदेवाडी, साबळेवाडी, हणमंतवाडी, नागदेववाडी
५) पाचवी फेरी - खुपिरे, हलसवडे, सांगवडे, इस्पूर्ली नंदगाव, गिरगाव, न्यू वाडदे, कोगील खुर्द, कोगील बुद्रुक,
६) सहावी फेरी - शिये, निगवे दुमाला, मुडशिंगी