कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीसाठी यड्रावकर गट व स्वाभिमानीने स्वतंत्र चूल मांडल्याने तिरंगी लढत होत आहे. सात हजार लोकसंख्या आणि साडेतीन हजार मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी राजकीय ईर्ष्या पेटली आहे.
गावात प्रा. संदीप राय्यण्णावर, प्रभाकर बंडगर , माजी सरपंच राजगोंडा पाटील (स्वाभिमानी), माजी उपसरपंच शाबगोंडा पाटील (यड्रावकर गट), संजय अनुसे (शिवसेना), सदाशिव माळी (काँग्रेस) असे प्रमुख गट आहेत. गत निवडणुकीत यड्रावकर-स्वाभिमानी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र, या निवडणुकीत जागा वाटप आणि नेतृत्वावरून आघाडीत बिघाडी झाल्याने दोघांनी स्वतंत्र आघाडी केली आहे, तर शिवसेना, काँग्रेस गट एकत्रित आल्याने तिरंगी लढत होत आहे. पाच प्रभाग असलेल्या ग्रामपंचायतीसाठी १३ सदस्य संख्या आहे. तिन्ही गट आणि अपक्ष असे एकूण सुमारे ८५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माघारीनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी तिरंगी लढतीने वातावरण तापले आहे. तसेच स्वाभिमानी-यड्रावकर गटाच्या फुटीचा फायदा काँग्रेस, शिवसेना आघाडी घेते काय, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.