उचगाव : निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील उजळाईदेवी (उज्ज्वल अंबा) मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे बनले आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी निसर्गाचे वरदान लाभलेल्या या मंदिराचा विकास केल्यास भक्तीबरोबरच पर्यटनदृष्ट्याही हा भाग विकसित होण्यास मदत होणार आहे. उजळाईवाडीच्या उदासी बुवाच्या माळावर नवदुर्गापैकी उजळाईदेवीचे (उज्ज्वल अंबा) चे मंदिर आहे. आजूबाजूला दगडी शिळा आहेत. उज्ज्वल अंबा देवीची मूर्ती नक्षीदार आणि सुबक अशीच खुलून दिसणारी आहे. त्यामुळे येथे अनेक भाविकांची ये-जा असते. मंदिराशेजारीच झऱ्याचे खळखळणारं पाणी अन् येथील नीरव शांतता सहजपणे कुणालाही भुरळ घालते. पावसाळ्यात येथील धबधबाही पर्यटकांना खुणावत असतो. मात्र, सध्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांचा ओढा वाढत आहे. मात्र, येथे आवश्यक सुविधा नसल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, वाहनतळ, भक्तीनिवास, रस्त्यावर दिवे आणि मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधणे ही कामे करण्याची मागणी होत आहे. या मंदिराचा विकास करण्यासाठी मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा देणे गरजेचे आहे.
चौकट : या परिसरात नीरव शांतता असल्याने रात्रीच्यावेळी येथे पार्ट्या होत आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन या पार्ट्यांवर पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.