कोल्हापूर : गतवर्षी महापुराच्या काळात तसेच यावर्षी कोरोना संसर्गाच्या काळात अत्यंत चांगले काम करून जनमानसांतील प्रतिमा उंचावलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थापनेला आज, मंगळवारी ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्जजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे. उत्पन्नाचे मार्ग मर्यादित आहेत. त्यात थकबाकीचे प्रमाणही अधिक आहे तरीही दैनंदिन तोंडमिळवणी करणाऱ्या पालिका प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात अर्थात २०१९ च्या महापुरात, कोरोना संसर्गाच्या काळात चांगले काम केले.
दहा दिवसांहून अधिक काळ पाणीपुरवठा करणारी यंत्रे महापुराच्या पाण्यात अडकून पडल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला तरीही अथक प्रयत्न करून कमीत कमी वेळेत पाणीपुरवठा सुरू करण्याचे शिवधनुष्य पेलले. शहरात कसलीही रोगराई फैलावणार नाही, याची खबरदारी घेतली.
मार्च २०२० मध्ये शहरात कोरोना संसर्गाची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी एक मोहीमच हाती घेतली. लॉकडाऊनमुळे शहरात अडकून पडलेल्या पर्यटक, प्रवाशांना रोज सकाळी व रात्री जेवण देण्याबरोबरच रस्त्याच्या कडेला असलेल्या तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन त्यांच्यावरील संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला.
लोकसहभागातून शहर स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ ठेवण्याचा तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला. तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी लोकसहभाग आणि पारदर्शक कारभारातून महानगरपालिकेची जनमानसांतील प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. सातत्याने टीकेची धनी बनलेले पालिका प्रशासन कौतुकाचा विषय ठरले.