कोल्हापूर : दिल्ली येथे १६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये एका युवतीवर बलात्कार झाला. स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे एवढी तरुणाई रस्त्यावर उतरली. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली तरीदेखील स्त्रियांवरील अत्याचार कमी होत नाहीत. अशा घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १६) तीन हजार मुली हातात काठी घेऊन ‘मी ताराराणी’ अशा घोषणा देत संचलन करणार आहेत, अशी माहिती ताराराणी संरक्षण दलाच्या निमंत्रक कविता जांभळे व वर्ल्ड फेडरेशन आॅफ डेमोक्रॅटिक यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.भवानी मंडप येथून मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू होणाऱ्या या संचलनात घोषणा देत व काळी पट्टी लावून युवती-महिला सहभागी होणार आहेत. संचलनाचा शेवट दसरा चौक येथे होणार आहे. या संरक्षण दलातर्फे महिलासाठी प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार अशी त्रिसूत्री चळवळ केली जाईल. २१ डिसेंबर रोजी महिलांसाठी ट्रेकिंगचे आयोजन केले आहे. या संचलनासाठी महाविद्यालयीन, शालेय युवती तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.रेश्मा पाटील, सुषमा पाटोळे, मानसी पोतदार, उमेश चौगुले, ज्योती राजपूत, नेहा शिंदे, नाईला खान, सीमा पाटील, रूपा रोकडे, सुप्रिया पाटील, मनौती पोवार, आदी उपस्थित होत्या.
तीन हजार ‘निर्भया’ उद्या उतरणार रस्त्यावर
By admin | Updated: December 14, 2014 23:45 IST