विश्वास पाटील -कोल्हापूरपहिलीपासून दहावीपर्यंत दोघेही वि. म. लोहिया मूकबधिर शाळेचे विद्यार्थी... शाळेत असतानाही त्यांना एकमेकांबद्दल कमालीची ओढ. त्यामुळे त्यांनी ठरविले आणि आयुष्यभराचे साथीदार झाले. त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे झाली, अगदी आनंदात त्यांचा संसार सुरू आहे. दोघेही मूकबधिर. एकमेकांशी हाताने खाणाखुणा करूनच त्यांचा संवाद होतो. पण त्यांचे परस्परांवरील प्रेमाचे बंधन इतके घट्ट आहे की तिथे शब्दही थिटे पडावेत. गौरी आणि अतुल सूर्यकांत भाळवणे असे या दांपत्याचे नाव.अतुलचे कुटुंबीय शाहूपुरीच्या चौथी गल्लीत राहणारे; तर गौरी भाळवणे लग्नापूर्वीची गौरी चोडणकर. रेल्वे फाटकाजवळ राहणारी. दोघांचीही कौटुंबिक स्थिती जेमतेमच. दोघेही भिन्न जातींतील; परंतु त्यांच्या लग्नात यातील काहीच आड आले नाही. दहावीपर्यंत ते शिकले. अतुलने धडपड करून नोकरी मिळविली. सध्या तो कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो. गौरी घरीच असते; परंतु ती नुसते घरकाम करून बसणारी मुलगी नाही. कुटुंबाला चार पैशांचा आधार व्हावा म्हणून तिने साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही मूकबधिर; परंतु तरीही ते सुरतला जातात व एकदम साड्या खरेदी करतात. ती ओळखीच्या महिलांना घरोघरी जाऊन साड्या विकते. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा ओम दुसरीत तर मुलगी सिद्धी पाचवीत शिकते. निसर्गाचा न्याय बघा. दोन्ही मुले सर्वसामान्य आहेत. म्हणजे बडबडी. त्याचाही आनंद या दाम्पत्यास आहे.सगळी सुखे व श्रीमंती पायांशी लोळत असूनही किरकोळ कारणांसाठी मानसिक त्रास करून घेणारी व छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आत्महत्येच्या मार्गाने जाणारी कुटुंबे पाहिली की अतुल-गौरी यांच्या जगण्याचे मोठेपण लक्षात येते. दोघांनाही एकही शब्द बोलता येत नाही. जे काही असेल ते एकमेकांना हातवारे करूनच ते सांगतात; परंतु म्हणून त्या वाचून त्यांचे काहीच अडलेले नाही. अतुल चांगला मुलगा आहे, त्याची कामात चांगली प्रगती आहे; म्हणून मी त्याच्याशी लग्न केले, असे गौरीने सांगितले. तो तुझ्याबरोबर भांडतो का? असे विचारल्यावर तिला जाम हसू आले... बोटाने हावभाव करीत तिने थोडा... थोडा भांडतो, असे सांगितले.हे दोघेही कोल्हापूर जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे कार्यकर्ते आहेत. कोल्हापुरातील पन्नासहून अधिक मूकबधिर मुले-मुली आठवड्यातून एक दिवस एकत्र जमतात. एकमेकांच्या अडीअडचणी सोडवितात. पती-पत्नीतील एक मूकबधिर व दुसरा सामान्य असल्यास विवाह जास्त दिवस टिकत नाही. उलट दोघेही मूकबधिर असल्यास एकमेकांना जास्त चांगले समजून घेतात, असे निरीक्षण असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर यांनी नोंदविले.
प्रेमाच्या बंधनापुढे शब्दही थिटे..!
By admin | Updated: February 13, 2015 23:59 IST