विश्वास पाटील- कोल्हापूर , राधानगरी तालुक्यातील राई येथे होणाऱ्या ३.८५ हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पावर जून २०१४ पर्यंत २९५ कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. परंतु धरणात मात्र, तीन थेंबही पाणी नाही, अशी प्रकल्पाची आजची स्थिती आहे.प्रशासकीय मान्यतेपासून तब्बल अठरा वर्षे होत आली तरी प्रकल्पाचे निम्मे काम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. गेल्या तीन वर्षात प्रकल्पासाठी दीडदमडीही मिळालेली नाही. निधी कधी मिळणार व प्रकल्प कधी पूर्ण होणार, याचे ठोस उत्तर पाटबंधारे विभागाकडेही नाही. धरणस्थळास भेट दिली तेंव्हा डोक्यावर इरलं पांघरून एक शेतकरी धरणावरून निघाला होता. त्यास प्रकल्प कधी पूर्ण होणार? अशी विचारणा केली. त्याचे उत्तर होते, ‘देवालाच माहीत...’महाराष्ट्रातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ््याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माधवराव चितळे समितीचा अहवाल शासनाने गेल्या चौदा जूनला विधानसभेत मांडला. या समितीनेही धामणी प्रकल्पातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. म्हणून या प्रकल्पाची सद्य:स्थिती काय आहे, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला. सध्या ज्या गतीने त्याचे काम सुरू आहे, ते पाहता आणखी वीस वर्षे गेली तरी हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याची खात्री देता येत नाही.राज्यात शिवसेना-भाजप युतीचे शासन असताना १९९५-९६च्या दरसूचीवर आधारित या प्रकल्पाच्या १२० कोटी ३० लाख रुपयांच्या किमतीस २४ डिसेंबर १९९६ ला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. पुढे सत्तांतर होवून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले. त्यामुळे पुढे २००० मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. प्रकल्पासाठी लागेल तेवढा निधी देऊ अशी घोषणाबाजीही त्या समारंभात झाली. मूळ प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाच्या वाढीव खर्चास २००३-०४ च्या दरसूचीवर आधारित ३२० कोटी ७० लाख रुपयांच्या किमतीस ९ फेब्रुवारी २००५ ला प्रथम सुधारित मान्यता मिळाली. त्यातील या प्रकल्पावर जून २०१४ अखेर २९५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.कृष्णा पाणी लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे पाणी अडवायचे, या चांगल्या उद्देशाने या प्रकल्पास घाईगडबडीत मंजुरी दिली. १९९५-९६ ची प्रशासकीय मान्यता २००० ला काम सुरू आणि वन जमीन उपलब्ध न झाल्यामुळे २००२-२००७ पर्यंत प्रकल्पाचे कामच बंद अशी स्थिती राहिली. त्यानंतर पुन्हा २००८ ते २०१४ पर्यंत काम सुरू राहिले. परंतु त्यानंतर गेली दोन वर्षे काम पूर्ण ठप्प आहे. (उद्याच्या अंकात : का रखडला प्रकल्प...?)
‘धामणी’साठी तीनशे कोटींचा चुराडा
By admin | Updated: July 12, 2014 00:59 IST