कोल्हापूर : शहरासह उपनगरांत महिलांच्या हातातील पर्स हिसकावून पसार होणाऱ्या गांधीनगर येथील तिघा चोरट्यांच्या मुसक्या राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने आवळल्या. संशयित सुमित रावलदास वसदानी (वय २२), कैलाश नारायणदस सुंदराणी (२२), अमित लक्ष्मणदास वसदानी (२६, तिघेही रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी १७ गुन्ह्णांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी, शहरामध्ये रात्रीच्यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या व पाठीमागे बसलेल्या महिलांच्या हातातील व खांद्यास अडकविलेल्या पर्स हिसकावून चोरी करण्याचे प्रकार वाढले होते.गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये अशा चोरट्यांनी शहरासह उपनगरांत धुमाकुळ घातला होता. पोलीस या टोळीचा शोध घेत असताना संशयित सुमित वसदानी हा पर्स चोरत असून त्यातून मिळालेल्या पैशांतून तो चैनी करत आहे, अशी माहिती खबऱ्याकडून राजारामपुरीचे पोलीस उपनिरीक्षक आण्णापा कांबळे यांना मिळाली.त्यानुसार त्याच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आपले साथीदार कैलाश सुंदराणी व अमित वसदानी यांच्या मदतीने पर्स चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याच्यास साथीदारांनाही अटककेली. (प्रतिनिधी)दिवसभर काम, रात्री चोरीसंशयित तिघांचेही शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात. हे तिघेही गांधीनगर येथील एका प्रसिद्ध कापडाच्या दुकानात कामास आहेत. दुकान रात्री आठ वाजता बंद झाले की, तिघे एकत्र येऊन रात्री बारापर्यंत महिलांच्या पर्स लांबविण्याचे काम करत असत. पर्स चोरीमधून भरपूर पैसे मिळू लागल्याने त्यांना चोरी करण्याची सवय लागली होती. चैनीसाठी चोऱ्या करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
महिलांची पर्स चोरणाऱ्या टोळीस अटक
By admin | Updated: July 28, 2015 23:13 IST