कोल्हापूर : पाचगावातील पाणीटंचाई आता लवकरच संपुष्टात येणार आहे. या गावाला गांधीनगर पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी राज्य शासनाने सहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी माहिती कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तत्कालिन लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रश्न अजून रेंगाळ्ल्याचेही त्यांनी सांगितले.महाडिक म्हणाले, गांधीनगर येथील दूधगंगा पंपिंग स्टेशनद्वारे पाचगावला सुमारे १२ लाख लिटर पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित होणार आहे. पाचगावची लोकसंख्या २५ हजार असून सध्या कळंबा तलाव, सुभाषनगर येथील उपसा पंप व गिरगाव शेजारील कोलांटी ओढ्याजवळील बोअर पंप अशा तीन ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. हे सर्व पाणी साधारणत: ६ ते ७ लाख लिटर इतक होते. मात्र, माणसी ४० लिटरप्रमाणे पाचगावला रोज सुमारे १२ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. दूधगंगा नदीचे पाणी सध्या गांधीनगर येथील पंपिंग स्टेशनद्वारे उपसा केले जाते. रोज १६ तास हे पंप पाणी खेचतात. या पंपाची क्षमता वाढवून दररोज २० ते २२ तास पाणी उपसा केला जाणार आहे. पाचगाव येथील साडेचार लाख लिटरची पाण्याची टाकी व गावठाणात बांधण्यात येणाऱ्या तीन लाख ७५ हजार लिटरची टाकी नवीन योजनेद्वारे भरली जाणार आहे. हे सर्व पाणी सुमारे साडेअकरा लाख लिटर इतके होते. सुमारे सहा कोटी रुपयांची ही योजना राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कार्यान्वित होणार आहे. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून, हे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून २० गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.यावेळी पाचगावच्या सरपंच शोभा भालकर, सदस्या मनीषा अशोक पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, सुनील कदम, सुहास लटोरे, अमर कारंडे, भिकाजी गाडगीळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिका निवडणुकीत पक्षासोबतआगामी महापालिका निवडणुकीत काय भूमिका राहील ? या पत्रकारांच्या प्रश्नावर या निवडणुकीमध्ये आपण पक्षासोबतच राहणार आहे. या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जे निर्णय घेतील त्यासोबत आपण राहू, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.
पाचगावचा पाणी प्रश्न सुटणार
By admin | Updated: February 13, 2015 23:56 IST