पहिल्या दिवशी गणवेशाची घोषणा हवेतच; गरज पाच कोटींची, मिळाले फक्त सव्वा कोटीराजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर शाळा सुरू होऊन दीड महिने उलटले तरी विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या पाहता गणवेशासाठी पाच कोटी रुपयांची गरज आहे; पण आतापर्यंत सव्वा कोटी रुपयांचा निधी शाळांना प्राप्त झाल्याने बहुतांश विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकांसह गणवेशाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची घोषणा हवेतच विरल्याची चर्चा शिक्षणक्षेत्रात सुरू आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. पहिल्या वर्षी शासनाच्या वतीने गणवेशाचे कापड दिले होते; पण शासनाकडून आलेले कापड व विद्यार्थ्यांची संख्या यात ताळमेळ बसत नसल्याने शासनाने थेट गणवेशाचे पैसेच देण्याचा निर्णय घेतला. दोन गणवेशासाठी शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला चारशे रुपये दिले जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. गुलाब फुलाबरोबर पुस्तक व गणवेश देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. पण, जिल्ह्यात गणवेशासाठी पात्र सुमारे ६५ हजार विद्यार्थी आहेत. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असताना १ कोटी ३३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या पैशातून एक गणवेशही खरेदी करता येत नसल्याने कोंडी झालेली आहे.
गणवेशाची प्रक्रिया अडकली निविदेत संतोष पाटील ल्ल कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थांसाठी आलेल्या गणवेशाच्या प्रत्येकी दोन जोड्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात आल्या. मागासवर्गीयांतील हिस्सा इतर विद्यार्थांना दिल्यानंतर त्यांच्या हक्काच्या गणवेशाची दुसरी जोडी अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहे. दोन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर शहरात महापालिकेच्या ६६ शाळा असून, त्यातील आठ शाळा बंद आहेत. सुरू असलेल्या शाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या ९,६७५ इतकी आहे. जवाहरनगर, सुभाषनगर, बाबा जरगनगर अशा उपनगरांमधील शाळांची पटसंख्या चांगली आहे. त्यातील जवाहरनगरमधील ल. कृ. जरग विद्यालय, तर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत भरविण्याचे नियोजन केले जाते. मुख्य शहरातील उर्वरित शाळांची पटसंख्या मात्र चांगलीच घसरली आहे. हे लक्षात घेऊनच सभापती संजय मोहिते हे प्रयत्नपूर्वक निधी उभा करून विद्यार्थी, विद्यार्थिनींना दप्तर, टिफीन बॉक्स, बूट, रेनकोट, कंपास बॉक्स, स्वेटर, आदी साहित्य देण्याचे नियोजन करीत आहेत. यासाठी त्यांच्याकडे पाच लाखांहून अधिकचा निधी जमा झाला असून, मदतीसाठी समाजातील दानशूर पुढे येत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला प्रशासनाची बाजू कमकुवत ठरत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जाती, जमातीसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आलेले गणवेश सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान पद्धतीने वाटप करण्यात आले. एकूण विद्यार्थ्यांपैकी ६८५७ विद्यार्थ्यांना गणवेश आले. उर्वरित २८१८ विद्यार्थ्यांनाही एक गणवेश देण्यात आला. एकसमानता राहावी, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला हे खरे. मात्र, महिला व बालकल्याण समितीतर्फे उर्वरित विद्यार्थ्यांसह या मागास विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रक्रिया रखडली आहे.