कोल्हापूर : पर्यावरण, सुरक्षा, आदी स्वरूपांतील आवश्यक ती ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळविल्यानंतर आता नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) चाचणीअभावी कोल्हापूरच्या विमानसेवेचे ‘टेक आॅफ’ अडले आहे. येत्या आठवड्यात चाचणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी जूनमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबईतील सुप्रीम एव्हिएशन कंपनीचे अधिकारी आणि कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिकांचे एकत्रित प्रयत्न सुरू झाले. ‘सुप्रीम’ने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी नियमित, कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर १५ आॅगस्टला विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमानसेवा पुरविण्यासाठी तयारी दर्शविलेल्या ‘सुप्रीम’ने सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या तीस मंजुरी, परवानगी आॅगस्ट अखेरपर्यंत मिळविल्या. तसेच राज्य शासनाच्या पातळीवरील सर्व प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र, नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून ‘एनओसी’ मिळण्यास विलंब झाल्याने विमानसेवा सुरू करण्याचा १५ आॅगस्टचा मुहूर्त टळला. दरम्यान, याबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चाचणी घेण्याबाबतच एक बैठक झाली आहे. काही उणिवांंची पूर्तता केली आहे. येत्या आठवड्यात ‘डीजीसीए’कडून चाचणी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘नागरी हवाई’च्या प्रक्रियेत अडकले ‘टेक आॅफ’
By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST