कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा द्यावा, सभागृहाने महापालिका बरखास्तीची मागणी राज्य शासनाकडे करावी, या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेने महापालिकेच्या दारात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. राजर्षी शाहू व महात्मा गांधी यांचे वेश परिधान केलेल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेने महापालिकेच्या दारात शुद्धिकरणाचा होम-हवन केला. महापौरांना राजीनाम्याची सद्बुद्धी यावी, भ्रष्टाचारामुळे बरबटलेली महापालिका शुद्ध व्हावी, यासाठी होम-हवनाच्या नावाखाली शुद्धिकरणाचा ‘स्टंट’ केल्याने शहरवासीयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘महापालिका बरखास्त करा’ ‘महापौर माळवींचा राजीनामा घ्या’ अशा घोषणांनी दुपारी बाराच्या सुमारास महापालिका परिसर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. भ्रष्टाचारात बरबटलेली महापालिका शुद्ध व्हावी, यासाठी मनपाच्या दारावर कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडले. महात्मा गांधी व राजर्षी शाहू महाराज यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला. अर्धा तास शास्त्रशुद्ध मंत्रपठणासह होमविधी सुरू होता. नगरसेवकांनी महापालिका बरखास्तीचा ठराव करून तो राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी शहरप्रमुख शिवाजी जाधव व दुर्गेश लिंग्रज यांनी केली. महापालिका बरखास्त करामहापौर राजीनामा न देणे व सत्ताधाऱ्यांनी बरखास्तीचा ठराव न करणे म्हणजे दोन्हींकडून महापौरांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. भ्रष्टाचारात बरबटलेल्या कारभारातून महापालिकेची पर्यायाने शहरावासीयांची सुटका करण्यासाठी मनपा बरखास्तीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत कार्यकर्त्यांनी यावेळी भाषणांतून व्यक्त केले.
महापालिकेच्या दारात शुद्धिकरणाचा ‘स्टंट’
By admin | Updated: February 24, 2015 00:45 IST