चंदगड : प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्यांना सामोरे जाताना सकारात्मक विचारांची गरज आहे. जीवन सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा मानसिक रुग्णालयातील डॉ .चारूशीला भास्कर यांनी केले.
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, सेवा रुग्णालयाच्या वतीने ‘विद्यार्थी ताणतणाव व कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. चारूशीला भास्कर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. पाटील बोलत होते.
डॉ. चारूशीला म्हणाल्या, गेले वर्षभर आपण सर्वजण कोरोनाशी सामना करीत आहोत. कोरोनाची लस आता उपलब्ध असली तरीही अजून कोरोना संपलेला नाही. अनेक महिन्यांनंतर शाळा चालू होत असल्याने विद्यार्थी तणावात आहेत. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यानी परीक्षेला सामोरे जाताना तणाव न घेता निर्भयपणे सामोरे जायला हवे. रोज प्राणायाम, फिरणे, सायकलिंग याबरोबरच पालेभाज्या, फळे असा चांगला आहार घेण्याचा सल्लाही डॉ. चारूशीला यांनी दिला. यावेळी डॉ. पूजा साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला व्ही. एन. सूर्यवंशी, एस. के. हरेर, एस. डी. पाटील, एस. के. पाटील, सी. डी. जोशी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी स्वागत केले. पी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर आर. व्ही. देसाई यांनी आभार मानले.
फोटो ओळी : अडकूर (ता. चंदगड) येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चारूशीला भास्कर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.