कोल्हापूर : हॉटेल मालक संघाच्या पुढाकाराने होत असलेल्या कोल्हापूर पर्यटन महोत्सवाला महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंबाबाई मंदिरापासून पर्यटकांसाठी टूर बस सोडून या महोत्सवाचा रविवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. मंगळवार दि. ३१ जानेवारीपर्यंत या महोत्सवांतर्गत पर्यटकांना सवलतीच्या दरात सहली करता येणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवामध्ये आचारसंहितेमुळे थेट शासन सहभागी नसले तरी आवश्यक पाठबळ देण्यात आले आहे. महोत्सवाच्या जाहिराती कोल्हापूरवगळता अन्यत्र मोठ्या प्रमाणावर शासनाकडून करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी अंबाबाई मंदिराच्या दारात पर्यटनासाठी सज्ज असलेली रंगीबेरंगी टूर बस पाहून पर्यटकांचे चेहरे खुलले. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख आणि डॉ. वत्सला देशमुख यांच्या हस्ते टूर बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांच्या हस्ते हैदराबादहून आलेल्या पर्यटकांना कोल्हापुरी भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, सचिव जयेश ओसवाल, संचालक शिवराज जगदाळे, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष उमेश राऊत, सचिव सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, मोहन पाटील, अरुण भोसले चोपदार, शंकरराव यमगेकर, धमेंद्र देशपांडे, अनिल तनवाणी, जयवंत पुरेकर, आशिष रायबागे, श्रीकांत पुरेकर, ‘केएसबीपी’चे सुजय पित्रे, अनुराधा पित्रे, सेवा मोरे, पर्यटन विकास महामंडळाचे स्थानिक प्रतिनिधी राहुल गवळी, विजय कुंभार, शाहू स्मारक ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी राजदीप सुर्वे, वासीम सरकवास उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्ताने संघ आणि कारवा हॉलिडेज यांच्यावतीने कोल्हापूर पर्यटनविषयक जागृती व मोफत मार्गदर्शन शिबिर आहे. बुधवारी (दि. १८) सकाळी दहा ते बारा या वेळेत हॉटेल अयोध्या, ताराराणी चौक येथे तर ३० जानेवारीला याच वेळेत हॉटेल पॅव्हेलियन येथे होणाऱ्या विनामूल्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ११ पर्यटक पहिल्याच दिवशी हैदराबादसह राज्यभरातील १५ पर्यटक या टूर बसमधून स्थळदर्शनासाठी रवाना झाले. अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, भवानी मंडप, खासबाग कुस्ती मैदान, टाऊन हॉल म्युझियम, न्यू पॅलेस म्युझियम, रंकाळा, कणेरीमठावरील सिद्धगिरी म्युझियम दाखविले जाते.