आमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी धुमशान सुरू झाले असून काही अपवाद वगळता सर्वच ठिकाणी सोयीच्या स्थानिक आघाडीच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, एकोणीस गावांपैकी राजकीय संवेदनाशील असणाऱ्या गुडाळ, म्हासुर्ली, तळाशी या गावांच्या निवडणुकीकडे सर्व तालुक्याच्या नजरा लागणार आहेत.
राधानगरी तालुक्यातील गवशी, बुंरबाळी, म्हासुर्ली, ऐनी, चाफोडी तर्फ, ऐन घोल सावर्धे, राजापूर, कोणोली तर्फ अंसडोली, कोदवडे, पंडेवाडी, हेळेवाडी, तळाशी, पनोरी, बुजवडे, गुडाळ, खिंडी व्हरवडे, कंथेवाडी, नरतवडे, आणाजे या एकोणीस गावांतील निवडणुका होत असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. स्थानिक आघाडीच्या जुळवाजुळवीना जोर आला आहे. तालुक्यात प्राधान्याने काँग्रेस, राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी सत्ता आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा काही ठिकाणी प्रयोग करण्यासाठी हालचाली आहेत. पण सोयीच्या स्थानिक आघाड्याच आकाराला येण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. एकोणीसपैकी म्हासुर्ली, गुडाळ, तळाशी, आणाजे, पनोरी या ठिकाणच्या लढती लक्षवेधी होणार आहेत. तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे एकखांबी नेतृत्व आहे, तर काँग्रेसमध्ये प्रत्येक नेत्यांचे गट आहेत. त्यामुळे आपापल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी देण्यासाठी नेते यंत्रणा लावत आहेत. तसेच शिवसेना, शेकाप, जनता दल, भाजप आपापल्या सोयीने स्थानिक आघाड्याच करणार आहेत.
बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून राजकीय धुमशान सुरू झाले आहे.