प्रकाश पाटील -कोपार्डे -गेल्या तेरा वर्षांत शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळविण्यासाठी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील या संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांवर धाक निर्माण केला होता. मात्र, विधानसभेत आलेल्या अपयशाचे पडसाद संघटनांच्या यावर्षीच्या आक्रमकतेवर स्पष्ट दिसून येत असून, संघटनांच्या मवाळ भूमिकेमुळे यंदा प्रथमच ऊसदर जाहीर न करताच कारखानदारांकडून नेटाने गाळप हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी मात्र निराश झाल्याचे चित्र दिसत आहे. २००१ पासून राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटित नेतृत्व आपल्या हातात घेतल्यानंतर कारखानदारांवर ऊसदराबाबत हंगाम सुरू करण्याअगोदर दर जाहीर करण्याचा धाक होता. यातून शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेची संकल्पना आणली. हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकऱ्यांना त्या हंगामात किती दर हवा आहे, याची घोषणा केली जायची. यानंतर ऊस परिषदेच्या जाहीर झालेल्या दरावर तोडगा काढल्याशिवाय कारखानदारांत हंगाम सुरू करण्याचे धाडस नसायचे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला कोल्हापूरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकच्या सीमाभागातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. कारखानदार ऊस तोडणी घेऊन दारात आले, तरी शेतकरी आपल्या उसाला खासदार शेट्टींच्या ऊस दराबाबत तडजोड झाल्याशिवाय कोयता लावू देत नव्हते आणि एखाद्या कारखानदाराने आपले राजकीय वजन वापरून हंगाम चालू केला, तर जिवाची पर्वा न करता शेतकरी रस्त्यावर लढाई करायचे. मात्र, यावर्षी विधानसभेत संघटनेला आलेल्या अपयशाचे पडसाद ऊस परिषदेत स्पष्ट दिसले. २७०० रुपये दर जाहीर करण्यापासून हा दर मिळविण्यासाठी कारखानदारांना २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेला अल्टिमेटम् यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच काळेबेरे असल्याचे दिसल्याने व त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या आक्रमक भूमिकेचा अभाव दिसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण दिसू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन असताना राजू शेट्टी यांनी बारामती, इंदापूर, कऱ्हाड अशी आंदोलने करून शासन व कारखानदारांना ‘सळो की पळो’ करून सोडले. मात्र, सत्तेत सहभागी होताच विश्वामित्री पवित्रा घेऊन ऊसदराबाबत मवाळ भूमिका घेऊन ज्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले त्यांच्या मनामध्ये शंकेला जागा निर्माण झाली आहे. यावर्षी कारखानदारांनी संघटनेची भूमिका पाहून सावध पवित्रा घेत ऊसदराबाबत मौन बाळगतच हंगाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे. राजू शेट्टी यांची आजपर्यंतची भूमिका व यावर्षीची भूमिका शेतकऱ्यांना निराश करायला लावणारी आहे. तीन हजारांच्या दराचा इशारा दिला असता, तर कुठे निर्ढावलेले कारखानदार वठणीवर आले असते. प्रत्येक वर्षी खतांचे दर वाढत असताना २७०० ची मागणी हास्यास्पद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला टार्गेट करणाऱ्या राजू शेट्टींनी आता सत्तेत येताच घुमजाव भूमिका घेतलीय. - कृष्णात पाटील, शेतकरी, वाकरे,ता. करवीरसंघटनेने दर जाहीर करायचा आणि कारखानदारांनी तो द्यावयाचा हे किती दिवस चालणार ? आज स्वत: कारखानदारांनी ऊसदर जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. २९०० दर घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. - विठ्ठल पाटील, शेतकरी संघटना कार्यकर्ते, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा
ऊसदराबाबत कारखानदारांचे मौन, संघटनांही मवाळ
By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST