कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सातपैकी पाच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. शिरोळ मतदारसंघांतच उमेदवारी कुणाला द्यायची, हा गुंता तयार झाला आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडून आज, बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारीबाबत प्राथमिक माहिती घेतली. परंतु नावे निश्चित होऊन चित्र स्पष्ट व्हायला आणखी काही दिवस जातील, असे पाटील यांनी सांगितले. सध्या ते मुंबईतच तळ ठोकून आहेत.गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची उमेदवारी निश्चित आहे. कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम, सागर चव्हाण यांनी उमेदवारी मागितली आहे. माजी आमदार सुरेश साळोखे यांनीही उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामार्फत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. परंतु सद्य:स्थितीत सत्यजित कदम यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची संधी अधिक आहे. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवक, पक्षाशी प्रामाणिक असलेला उमेदवार व दोन वर्षांपासूनची निवडणुकीची तयारी या निकषांवर त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जात आहे. आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला आहे. माजी आमदार मालोजीराजे यांनीही आपण रिंगणात राहणार नसून सत्यजित कदम यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, असे पत्रच दिले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.शिरोळमध्ये स्वत: सा. रे. पाटील हेच उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हे दिल्लीत निश्चित होणार आहे. वयामुळे गेल्यावेळेसच त्यांच्या उमेदवारीस दिल्लीतून विरोध झाला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वजन वापरून ही उमेदवारी आणली होती. त्यामुळे आता त्यांच्या वयाचीच अडचण महत्त्वाची आहे. त्यांचा मुलगा गणपतराव पाटील यांनी थेट उमेदवारी मागितलेली नाही, परंतु मला नसेल तर मुलास उमेदवारी द्या, असा आमदार पाटील यांचा आग्रह आहे. त्यानुसार गणपतराव पाटील यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. तालुक्याच्या राजकारणात त्यांची राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाशी युती आहे. विधानसभा वगळता अन्य निवडणुकीत ते एकमेकांना सोयीची भूमिका घेत असल्याचा अनुभव लोकांनाही आहे. या मतदारसंघातून ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील व अनिल यादव यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.शाहूवाडी मतदारसंघात कर्णसिंह गायकवाड यांनीच फक्त काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असल्याने तीदेखील नक्की समजली जाते. तिथे गायकवाड यांच्यापेक्षा काँग्रेसलाच त्यांच्या उमेदवारीची जास्त गरज आहे. या मतदारसंघातून सलग दोन निवडणुकीमध्ये काँग्रेस पराभूत झाली आहे. आताही ती लढतीत तीन नंबरवर आहे. परंतु निवडणूक लढवली नाही तर गट टिकत नाही आणि पक्षाची प्रतिष्ठा म्हणून कर्णसिंह गायकवाड यांना हातात झेंडा घ्यावा लागेल, असे आजचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
शिरोळलाच फक्त उमेदवारीचा गुंता
By admin | Updated: September 4, 2014 00:16 IST