भुर्इंज : ओझर्डे (ता. वाई) येथे पद्मावती देवीच्या यात्रेत बुधवारी मध्यरात्री बारा वाजता शोभेच्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सातजण होरपळले. त्यातील दोन चिमुरड्यांची प्रकृती गंभीर आहे. आग विझविताना झळा लागून पंधराजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी इस्लामपूर येथील वामन आमले व त्याच्या दोन साथीदारांना भुर्इंज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन चिमुरड्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बुधवारी ओझर्डे गावचा यात्रेचा पहिला दिवस होता. रात्री बारा वाजता यात्रेला सुरुवात झाली. छबिन्यात शोभेची दारू उडविण्याचे काम मूळचे कवठेएकंद येथील व सध्या इस्लामपूर यल्लमा चौक येथे वास्तव्यास असणारे विक्रम भिकोबा आमले व त्यांचे कामगार सावकर रामचंद्र पाटील (रा. साखराळे, ता. वाळवा) व मारुती भाऊ सुतार (रा. बेघरवस्ती, इस्लामपूर) गेल्या दोन पिढ्यांपासून करीत आहेत. यंदाच्या यात्रेसाठी वामन आमले यांनी एका पोत्यात भरून आणलेला दारूगोळा यात्रेत मांडलेल्या खेळण्याच्या दुकानाजवळ ठेवला होता. छबिन्याला सुरुवात होताच वामन आमले याने शोभेची दारू उडविण्यास सुरुवात केली. त्याचीच ठिणगी दारूगोळ्याच्या पोत्यावर पडल्याने स्फोट झाला.या स्फोटात गोपाळ समाजातील व्यक्तीने मांडलेली खेळण्याची दुकाने जळून खाक झाली. तसेच दुकानात कॉटखाली झोपलेल्या गीता रामदास पवार (वय ५), पूजा रामदास पवार (९) यांच्यासह खेळणी विक्री करणारे रेखा अनिल पवार, अनिल सायबू पवार (वय २५), सुरेखा अनिल पवार (२२) आणि ओझर्डेचे ग्रामस्थ रवींद्र बाळासाहेब पिसाळ (३०) व चंदर उत्तम पिसाळ हे जखमी झाले. या धावपळीत वामन आमले पळून गेला.संशयिताला इस्लामपुरातून घेतले ताब्यातदारूगोळ्याचा स्फोट झाल्यानंतर सर्वत्र एकच पळापळ सुरू झाली. या धावपळीत दारूगोळा उडविणारा वामन आमले पळून गेला. मात्र, ग्रामस्थांनंी भुर्इंज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व सचिन ससाणे यांना घेऊन इस्लामपूरला जाऊन वामन आमलेला ताब्यात घेतले. दुकानांना आगीचा वेढास्फोटाची तीव्रता एवढी होती की काही क्षणातच दुसरी दुकानेही आगीने वेढली गेली. ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.यात्रेवर संकटांचे सावटसलग तीन वर्षे ओझर्डे गावच्या यात्रेवर काहीना काही संकट कोसळत आहे. यावर्षी स्फोट झाला. गेल्या वर्षी वादळाने यात्रेत दाणादाण उडाली, तर तीन वर्षांपूर्वी काही कारणास्तव यात्राच भरली नाही. स्फोटाच्या घटनेनंतर यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.यात्रा समिती फैलावरदरम्यान, वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर व तहसीलदार सहदेव पडदुणे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. या घटनेबाबत शासकीय कर्मचारी व यात्रा समितीच्या सदस्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. येथून पुढे यात्रेत येणारी दुकाने मोकळ्या जागेत थाटावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यात्रा समितीने गोपाळ समाजाच्या कुटुंबाला तत्काळ दहा हजारांची मदत दिली.
दारूगोळा स्फोेटात सात होरपळले
By admin | Updated: April 10, 2015 00:27 IST