कोल्हापूर : वयाची पासष्टी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे ओळखपत्र शासनप्रक्रियेनुसार पंधरा दिवसांत मिळते. त्यासाठी कागदपत्रे व तत्सम खर्च पन्नास रुपयांच्या घरात आहे. शासनाकडून ओळखपत्र देताना खातरजमा करूनच ते संबंधिताला दिले जाते. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना ही ओळखपत्रे देण्यात आली आहेत.शिरोली (ता. हातकणंगले) येथे २०० रुपयांत ५० वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित एका सामाजिक संस्थेकडून ज्येष्ठ नागरिक कार्ड (ओळखपत्र) काढून देण्याचा प्रकार उघडकीस आला. ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यानंतर शासन व शासनमान्य ज्येष्ठ नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या ओळखपत्रांबाबतची प्रक्रिया संबंधित विभागाकडून ‘लोकमत’ने जाणून घेतली आहें.जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांचे काम हे राजर्षी शाहू सुविधा केंद्र (सेतू)च्या माध्यमातून चालते. या केंद्रातून ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीलाच हे ओळखपत्र दिले जाते. हे ओळखपत्र देण्यासाठी या ठिकाणी संबंधित व्यक्तींकडून शाळेचा दाखला किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहीचा वयाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशनकार्डची झेरॉक्स, दोन आयडेंटी साईज फोटो व मागणी अर्ज अशी कागदपत्रे घेतली जातात. त्यानंतर आपल्याकडील ओळखपत्रावर हे फोटो लावून ते तयार करून निवासी नायब तहसीलदारांच्या सहीकरीता पाठवून दिले जाते. त्यांच्या सहीनंतर हे ओळखपत्र संंबंधित व्यक्तीला दिले जाते. या प्रक्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. या ओळखपत्रासाठी ‘सेतू’ केंद्रातून ३५ रुपये घेतले जातात. या ओळखपत्राचा उपयोग फक्त एस.टी. प्रवासासाठी होतो. यामध्ये तिकिटात पन्नास टक्के सवलत मिळते. या वर्षभरात ‘सेतू’ केंद्रातून ४३६ ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.शासनमान्य ज्येष्ठ नागरिक संघांकडूनही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन संबंधितांना ओळखपत्रे दिली जातात. जिल्ह्यात ३२५ तर कोल्हापूर शहरात २० ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. या संघांमधून ६० वर्षांच्या पुढील व्यक्तीसही ओळखपत्र दिले जाते. त्यांना यामुळे आयकर माफची सवलत मिळते. रेल्वे प्रवासात तिकिटामध्ये महिलांना ५० टक्के तर पुरुषांना ४० टक्के सवलत मिळते. परंतु त्यांना या व्यतिरिक्त ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तीला मिळणारी एस.टी.ची सवलत लागू होत नाही. ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तीचे ओळखपत्र या संघांमधून काढून दिले जाते. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी ज्येष्ठ नागरिकांच्या सभासदांची बैठक असते यावेळी ज्यांचे कार्ड काढायचे आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली जातात. नंतर ती कागदपत्रे निवासी नायब तहसीलदारांसमोर सादर करून त्यांच्याकडून सही घेतल्यानंतरच ओळखपत्र तयार होते. ते पुढील बैठकीत संबंधित व्यक्तीला दिले जाते. यासाठी त्यांच्याकडून ५० रुपये घेतले जातात. आतापर्यंत शासन तसेच विविध ज्येष्ठ नागरिक संघांच्या माध्यमातून जिल्ह्यात १० हजारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना हे ओळखपत्र देण्यात आले आहे. त्याचा त्यांना लाभ होत आहेत. (प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांसाठी महिन्याला किमान १० ते १५ सरासरी प्रकरणे येतात. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे संबंधितांकडून रक्कम घेतली जाते. या ठिकाणी जादा रक्कम घेऊन शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले जात नाही.- तानाजी ऱ्हायकर, व्यवस्थापक, ‘सेतू’ केंद्रकाही राजकीय हितसंबंध असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक संघटनांकडून जिल्ह्यातील नागरीकांना बोगस ओळखपत्रे देण्यात आली आहेत. परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या संघटनांकडून संपूर्ण शहानिशा करूनच आतापर्यंत योग्य असणाऱ्या व्यक्तीला ओळखपत्रे दिली आहेत.- मानसिंग जगताप, अध्यक्ष, राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघ.