संतोष पाटील ल्ल कोल्हापूरशहरातील सर्वच वॉर्डांतील गळतींचे प्रमाण वाढले आहे. मुख्य पाईपलाईनला गळती असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या सर्व गळती काढण्यासाठी उपसा बंद करून किमान चार ते आठ दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात गळती काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी भाड्याने टॅँकर घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपायुक्त विजय खोराटे यांनी ‘लोकमत’ला दिली.महापालिकेकडून दररोज १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा पंचगंगेतून उपसा केला जातो. मात्र, यातील २५ टक्के पाणी पाईपलाईनच्या गळतीमुळे वाया जाते. या पाण्याची किंमत महिन्याला एक कोटीपेक्षा अधिक आहे. परिणामी, वर्षाला साधारण १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी गळक्या पाईपलाईनमुळे होत आहे. थेट पाईपलाईनऐवजी १८ वर्षांपूर्वी गळकी शिंगणापूर योजना महापालिकेने शहरवासीयांच्या माथी मारली. या पाईपलाईनवर दिवसातून सरासरी दोनवेळा गळती काढण्याचे काम सध्या महापालिका करते. पाण्याची गळती, दुरुस्ती व त्यामुळे होणारे रस्त्यांचे नुकसान, असे मिळून किमान महिन्याला कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.आगामी दहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे पाण्यासाठी इच्छुकांकडून होणाऱ्या आंदोलनातही वाढ होणार आहे. मुख्य पाईपलाईनला असणाऱ्या गळतीसह उपवाहिन्यांच्या गळती काढण्यासाठी महापालिकेने गळतीचे महानियोजन केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या गळती काढण्यात येणार असल्याने शहरातील सर्वच ए, बी, सी व डी वॉर्डांत किमान चार ते आठ दिवस कमी दाबाने, तसेच अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी साडेदहा लाख रुपये खर्चून खासगी टॅँकर भाड्याने घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी अल्पकाळाची निविदाही काढण्यात आली आहे. २९ डिसेंबरला निविदा खुली केली जाणार असून, १५ दिवसांसाठी भाड्याने टॅँकर घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या मोहिमेमुळे गळतीबाबत ठोस मोहीम जरी होणार असली तरी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यादरम्यानच पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. ‘आयआरबी’कडून पेनल्टीची मागणीफुलेवाडी रिंगरोड, कळंबा, वाशी नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, कावळा नाका परिसर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, आदी परिसरांत पाण्याच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत झालेल्या ४९ किलोमीटर काँक्रिटच्या रस्त्याखाली अडकलेल्या पाईपलाईनच्या गळतीचे प्रमाणही अधिक आहे. या रस्त्यावरील एका गळतीसाठी ‘आयआरबी’कडून ७० ते ९० हजार रुपयांची पेनल्टीची मागणी महापालिकेकडे केली जाते. आतापर्यंत ४० हून अधिक अशा गळतींच्या पेनल्टींसाठी पत्रे महापालिकेला ‘आयआरबी’ने पाठविल्याचे समजते. यावरून गळतीचे प्रमाण व त्याची आर्थिक दाहकता लक्षात येते.
नववर्षाचे स्वागत टंचाईने
By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST