कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पक्षनेतृत्वाला दिलेला शब्द खरा करून दाखविला. या विजयाने काँग्रेसचे दक्षिण महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. दिल टाकलेल्या पैलवानासारखी स्थिती झालेल्या काँग्रेसला त्यांनी लढायला आणि जिंकायलाही शिकविल्याचे प्रत्यंतर या निकालाने आले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्वच जिल्ह्यात मिळालेले भक्कम पाठबळ हेदेखील या विजयाचे महत्त्वाचे कारण आहे.
दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे चार व आता विधान परिषदेचे दोन असे तब्बल सहा आमदार झाले आहेत. काँग्रेसचा भरभराटीचा काळ होता तेव्हाच एवढी पक्षाची ताकद होती. विधानसभेच्या निवडणुकीतही शून्यावरून चार आमदार निवडून आणण्यात सतेज पाटील यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत होते. ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना विजयी करण्यासाठी ते पायांना भिंगरी लावून फिरले. तसेच कष्ट त्यांनी आता आसगावकर यांच्या विजयासाठी घेतले. विधानपरिषदेची गेलेली जागा स्वत: लढवून ती खेचून आणली. लोकसभेला ‘आमचं ठरलंय’ अशी कॅचलाईन घेऊन त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना खासदार केले. त्यानंतर विधानसभेतील आणि आता आसगावकर यांचा विजय अशी एकापाठोपाठ एक विजयाची माळ लावून ‘जिकडे सतेज तिकडे विजय’ असे समीकरण घट्ट केले.
कोल्हापुरात ५ नोव्हेंबरला काँग्रेसच्या मेळाव्यात सतेज पाटील यांनी ‘दोन्ही मतदार संघांतील एक जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी, ती निवडून आणण्याची जबाबदारी माझी,’ असा शब्द नेतृत्वाला दिला. त्यानुसार शिक्षक मतदार संघाची जागा काँग्रेसला मिळाली. या मतदार संघातून एकूण सहाजण इच्छुक होते; परंतु आसगावकर यांच्या उमेदवारीवर मोहोर उठविल्यावर अन्य पाचजणांना एकत्र करून त्यांना विश्वास दिला व जिल्ह्यात त्यांच्यात मतैक्य घडविले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून आसगावकर यांना एकमुखी पाठबळ मिळाले. आसगावकर हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले होते. तशी त्यांची फारशी तयारीही नव्हती आणि त्यांचा चेहराही फारसा परिचित नव्हता; त्यामुळे त्यांच्यामागे जनमत उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. ‘तुम्हांला शिक्षक हवा की संस्थाचालक?’ असाही प्रचार झाला; परंतु तो मतपेटीपर्यंत जाणार नाही, याची दक्षता घेतली. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ची सगळी यंत्रणा उभी केली. आसगावकर उमेदवार असले तरी आपण स्वत: उमेदवार असल्यासारखे ते या निवडणुकीत राबले. त्यांना पहिल्या पसंतीची मते कशी जास्तीत जास्त मिळतील असे प्रयत्न त्यांनी केले. एकदा डोक्यात निवडणूक भिनली की त्यात गुलाल लागेपर्यंत उसंत घ्यायची नाही असा त्यांचा स्वभावच बनला आहे. त्यामुळेच ते नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून विजय खेचून आणू शकले.
या निवडणुकीत त्यांनी पाच जिल्ह्यांत जाऊन दोन-दोन दिवस प्रचाराची राळ उठवून दिली. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या सतेज यांना त्या निवडणुकीतील संपर्क यावेळेला कामी आला. सांगलीत राज्यमंत्री विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुण्यात कमलताई व्यवहारे, अभय छाजेड, रमेश बागवे, अरविंद शिंदे, मोहन जोशी, आबा बागुल, सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे व अन्य पदाधिकारी यांच्याशी असलेल्या उत्तम संबंधांचा या निवडणुकीत खूप फायदा झाला. हे सगळ्या नेत्यांनी मनापासून काम केले. त्यामुळेच हा विजय साकारू शकला.