कोडोली : कोडोली परिसरात चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या चौघा घरफोड्यांना तसेच महिलांची फसवणूक करून त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २० तोळे सोने, तीन एलसीडी, असा मुद्देमाल जप्त केला. सागर संभाजी गोसावी (वय २२), विकास ऊर्फ विकी प्रकाश गोसावी (२२), सुभाष ऊर्फ पिंटू आण्णासाहेब गोसावी (२४, सर्व रा. बागणी, ता. आष्टा, जि. सांगली) व अक्षय ऊर्फ गोट्या नंदकुमार सातपुते (२०, रा. रेड, ता. वाळवा, जि. सांगली) अशी घरफोड्यांची नावे असून, त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालापैकी आठ तोळे सोने व एलसीडी हस्तगत केला. याशिवाय दुसऱ्या गुन्ह्यातील दस्तगीर मेहबूब शेख (रा. सदरबाजार, कोल्हापूर) याला अटक केली असून, त्याच्याकडून १२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. याबाबत कोडोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहापूर (ता. पन्हाळा) येथील वसंत दत्तू समुद्रे हे २०१३ मध्ये बाहेरगावी गेले असता सांगली जिल्ह्यातील या चौघांच्या टोळीने त्यांच्या घरी घरफोडी करून सोने, चांदीचे दागिने व तीन एलसीडींची चोरी केली होती. या चारही संशयितांना हातकणंगले पोलिसांनी पकडून कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरीपैकी आठ तोळे सोने व तीन एलसीडी पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले. तसेच कोडोली येथील शांताबाई यशवंत पाटील (६५) यांचे सात तोळे सोन्याचे दागिने, पोखले (ता. पन्हाळा) येथील श्रीमती लक्ष्मी महादेव पाटील (७५) यांचे पाच तोळे सोन्याचे दागिने दस्तगीर शेख याने भूलथापा लावून लंपास केले होते. या दोन वृद्धांना त्याने बॅँकेत पेन्शन आल्याचे सांगून आपल्या दुचाकीवर बसवून नेऊन निर्जन ठिकाणी थांबवून दागिने लुटले होते. या शेखकडून १२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणाचा तपास कोडोली पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सांगलीच्या चार घरफोड्यांना अटक
By admin | Updated: November 13, 2014 23:50 IST