कोल्हापूर : विविध क्षेत्रांत आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या ४२ प्रेरणादायी महिलांचा ‘लोकमत’तर्फे वुमन ॲचिव्हर्स अवॉर्डने रविवारी शानदार समारंभात सन्मान करण्यात आला. मराठी व हिंदीतील ख्यातनाम अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते या अवाॅर्डस्चे वितरण करण्यात आले. या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या कॉफीटेबल बुकचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.
महाराजा सुप्रीम बक्वेट या अलिशान सभागृहामध्ये सामाजिक अंतर आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षात्मक सूचनांची योग्य अंमलबजावणी करत संपन्न झालेल्या या समारंभामध्ये किशोरी शहाणे यांनी महिलांच्या प्रगतीचे मनापासून कौतुक केले. विधायकतेची पूजा बांधणाऱ्या ‘लोकमत’ने महाराष्ट्रातील महिलांच्या कामगिरीला सलाम करण्याची ही परंपरा अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नेहमीच जोपासल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. कोरोनाच्या काळामध्ये सर्वचजण घरात असल्याने पुन्हा महिलांवरचीच जबाबदारी वाढली; परंतु सगळे घरात एकत्र आल्याने अनेकांच्या सुप्तगुणांना या काळात वाव मिळाला. आमच्या माता-भगिनींनीही हा वेळ सार्थकी लावल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले, असे निरीक्षण शहाणे यांनी नोंदविले.
सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी किशोरी शहाणे यांच्यासह उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये संपादक वसंत भोसले म्हणाले, माहेरचे संस्कार आणि सासरचे पाठबळ घेऊन या महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्तम अशी कामगिरी बजावली आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा शोध ‘लोकमत’ नेहमीच घेत असते. पश्चिम महाराष्ट्रात अशा कर्तबगार महिला आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. ही उद्याची प्रेरकशक्ती आहे. यावेळी या सर्व महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खजिनदार वैशाली क्षीरसागर, वारणा वडगावकर, बबिता अग्रवाल, मनिषा कर्नावट, प्राजक्ता अकोळे उपस्थित होत्या. कॉफीबुक टेबलसाठी संपादन सहाय्य करणारे भरत बुटाले आणि प्रगती जाधव-पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या समारंभामध्ये तुषार कर्नावट, गणेश तुप्पद, सुजित लाड, नितीन अग्रवाल, ‘लोकमत’चे विभागप्रमुख श्रीराम जोशी, विवेक चौगुले, महेश पन्हाळकर, दीपक मनाठकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी ‘लोकमत’च्या अशा उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर उपस्थितांचे आभार मानले. ऐश्वर्या पवार यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
आरोग्याची काळजी घ्या
एकीकडे संसार करत असताना, घर सांभाळत असताना, घरच्या माणसांची काळजी करत असताना आणि हे करताना नोकरी, व्यवसाय सांभाळणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा आपुलकीचा सल्ला यावेळी किशोरीताईंनी उपस्थित महिलांना दिला.
चौकट
राॅक बॅण्डने डोलवले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एम. प्रीतेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या द अल्फाबेटस् रॉक बॅण्डने उपस्थितांना डोलवले. कोरोनाच्या कटू आठवणी बाजूला सारत गेल्या अनेक महिन्यांत सादर झालेल्या या प्रत्यक्षातील सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या रॉक बॅण्डच्या तालावर सादर केलेल्या मराठमोळ्या लावणीलाही उपस्थितांना मोठा प्रतिसाद मिळाला.
चौकट
‘फॅशन शो’चे आकर्षण
मध्यंतरावेळी फातिमा अन्ड फिजा प्रेझेंटस् ग्लिट्झ न ग्लॅमर या ‘फॅशन शो’ने उपस्थितांची मने जिंकली. यासाठी अग्रवाल डिझायनर हबचे सहकार्य लाभले.
चौकट
यांचा झाला सन्मान
वैशाली राजेश क्षीरसागर, प्रिया बासरानी, रश्मी भोसले, निधी चेणे, सुप्रिया डांगे, स्मिता देशमुख, डाॅ. प्रियांका गायकवाड, नीता घोडके, संयोगीता गुरुजी, आशा हजारे, डॉ. श्वेता विजय इंगळे-सरकार, अर्चना जाधव, जया जोशी, संजीवनी कदम, स्मिता खामकर, प्राजक्ता कोरे, प्रीती क्षीरसागर, अमृता मगर, ज्याेत्स्ना मळेकर, सलीमा मुल्ला, प्रा. डाॅ. कॅप्टन कीर्ती पांडे, राधिका पन्हाळे, उत्कर्षा पाटील, डॉ. प्रा. प्रभा पाटील, राजनंदिनी पतकी, डॉ. उज्ज्वला पत्की, डॉ. सुनीता पवार, सिद्धी पवार, डॉ. गीता पिल्लई, सोनाली राजपूत, डॉ. रेखा सारडा, केतकी पाटील-सरनाईक, सुनीता शेरीकर, मनीषा सोनी, गीता सुर्वे, श्रद्धा, शोभा तावडे, सिद्धीदा थोबडे, गीतांजली उपाध्ये, दिशा पाटील, प्राचार्या गीता पाटील, मनीषा राेटे