कागल : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यासमवेत कागल शहरातील मतदारांशी घरोघरी संपर्क साधत कागलवासीयांशी हितगूज केले. कागलचे सुपुत्र हसन मुश्रीफ आणि कागल नगरीचे युवराज समरजितसिंहराजेच आपल्या दारी येत असल्याने नागरिकांनी दारासमोर, रस्त्यावर रांगोळी काढल्या होत्या. प्रत्येक चौकात कार्यकर्ते, नागरिक, अबालवृद्ध गर्दी करून स्वागतासाठी हजर होते. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जय-जयकाराच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघत होता. अवघ्या कागल शहरभर राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर, पताका फडफडत होत्या. साहेब, तुम्ही कागलची चिंता करू नका, आम्ही गाववाल्याना अंतर देणार नाही, अशा शब्दांत मुश्रीफ आणि समरजितसिंहांकडे कागलकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सकाळी साडेसात वाजता नगरपालिकेसमोरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या प्रचारफेरीला सुरुवात झाली. हणबर गल्ली, सोमवार पेठ, शिवाजी चौक, ब्रह्मपुरी, आझाद चौक, सणगर गल्ली, धनगर गल्ली, घाटगे गल्ली, बापूसाहेब महाराज चौक, गैबी चौक, अशी ही संपर्क मोहीम झाली. दुपारी दोनपर्यंत स्वतंत्रपणे हा संपर्क साधण्यात आला. भर उन्हात नागरिक दारा-दारांत या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी उभे होते. यावेळी नगराध्यक्षा आशाकाकी माने, उपनगराध्यक्षा उषा सोनुले, शाहू साखरचे संचालक बाबी माने, कागल बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, भैया माने, प्रकाश गाडेकर, अशोक जकाते, रमेश सणगर, रघुनाथ जकाते, रमेश माळी, कर्णसिंह रणनवरे, विवेक कुलकर्णी, सौरभ पाटील, पांडुरंग सोनुर्ले, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपर्क फेरीत हसन मुश्रीफ आणि समरजितसिंहांना नागरिक आवर्जून घरात येण्याचा आग्रह करीत होते. सरबत, चहा, ताक, साखरपाणी ते दसऱ्याच्या कडाकण्याही खाण्यास देत होते. हे दोन्ही नेते मतदानाबद्दल विनंती करताच कागलकर म्हणत होते, ‘गाववाल्यांच्या पाठीशीच आम्ही राहणार, काय सांगायची गरजच नाही.’
‘साहेब, कागलची चिंता करू नका’
By admin | Updated: October 5, 2014 23:06 IST