कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांचे धनी ठरलेल्या आणि ठेकेदारांपुढे हात टेकलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आज, सोमवारी उशिरा का असेना अखेर शहाणपण सुचले. रस्त्यांची कामे घेतलेल्या सर्वच ठेकेदारांना आज बोलावून घेऊन मनपा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दम भरतानाच, कोणत्याही परिस्थितीत २० नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करा, अन्यथा त्याच दिवसापासून प्रत्येक दिवसाला प्रत्येक रस्त्यासाठी पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असा इशारा दिला. कामाची प्रगती असमाधानकारक राहिल्यास ठेकेदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करून मनपाची पायरी पुन्हा कधीही चढू देणार नाही, असा दम यावेळी देण्यात आला. शहराचा निम्म्याहून अधिक भाग अक्षरश: खड्ड्यात बुडाला आहे. रस्त्यांची कामे सुरू करण्यात ठेकेदारांनी उदासीनता दाखविली आहे. नागरिकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे सार्वत्रिक टीकेचे धनी बनलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना अखेर आज जाग आली. महापालिका आयुक्त बिदरी यांनी रस्त्यांची कामे घेतलेल्या सर्व ठेकेदारांना आज ताराबाई पार्क कार्यालयात बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कामे घेतलेले ठेकेदार उपस्थित होते. सन २०१० मध्ये नगरोत्थान योजनेतून शहरातील ३९ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली; परंतु रस्त्यांच्या कामातील ढपले पाडण्याची प्रवृत्ती, भागात झालेला कथित समाजिक कार्यकर्त्यांचा विरोध, एकाच कामात दोन वेळा टक्केवारीची मागणी, ठेकेदारांची मुजोरी, अधिकाऱ्यांची बेपर्वाई अशा विविध कारणांनी या रस्त्यांच्या कामांना ‘खो’ बसला. महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या कामांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही; परंतु त्याचा नाहक त्रास शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मनपा सभागृहात प्रशासनावर टीका झाली. ‘लोकमत’नेही विशेष वृत्तमालिका प्रसिद्ध करून खराब रस्त्यांच्या प्रकरणी प्रशासनाला फटकारले. (प्रतिनिधी)खराब कामे केलेल्यांना नोटिसा ज्या ठेकेदारांनी यापूर्वी रस्त्यांची कामे घेतली होती; परंतु त्यांच्याकडून खराब रस्ते केले गेले अशा ठेकेदारांना मनपा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजावलेल्यामध्ये सहा ठेकेदारांचा समावेश आहे. मुदतीपूर्वीच खराब झालेले एकूण १७ रस्ते दि. ३० नोव्हेंबरपूर्वी दुरुस्त करून द्या, असा आदेशच ठेकेदारांना दिला आहे. जे ठेकेदार रस्ते दुरुस्त करणार नाहीत, त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल. जर त्यांनी नव्याने कामे घेतली असतील तर ती काढून घेतली जातील. शिवाय भविष्यकाळात महापालिकेची पायरी चढू दिली जाणार नाही. पुढे कोणतेही काम त्यांना देण्यात येणार नाही. आजच्या बैठकीत तसे स्पष्ट करण्यात आले. कोण करणार रस्ते ?पॅकेज क्रमांक १ : हे काम शिवपार्वती कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले असून, या पॅकेजअंतर्गत दहा रस्ते करायचे आहेत. जून महिन्यात कामाची वर्कआॅर्डर दिली आहे. पॅकेज क्रमांक २ : हे काम आर. ई. इन्फ्रा कंपनीला देण्यात आले असून,या पॅकेजअंतर्गत दहा कामांचा समावेश. मार्च महिन्यात वर्कआॅर्डर दिली आहे. पॅकेज क्रमांक ३ : हे काम युव्हीबी कंपनीला देण्यात आले. या पॅकेजअंतर्गत सात रस्त्यांची कामे करायची आहेत. या कंपनीने काही रस्त्यांची कामे तीस टक्क्यांपर्यंत पूर्ण केली आहेत. पॅकेज क्रमांक ४ : हे काम निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. बारा रस्त्यांचा यात समावेश असून, सप्टेंबरमध्ये वर्कआॅर्डर देण्यात आली. काम सुरूकरण्यास डेडलाईन गेल्या चार वर्षांत रस्त्यांची कामे घेतलेल्या ठेकेदारांना काम कधी पूर्ण करायचे याची डेडलाईन दिली होती. पंधरा महिन्यांची मुदत देऊनही त्यांची कामाला सुरुवात केली नाही. काही ठेकेदारांनी ही कामे तीस टक्क्यांपर्यंत पूर्ण करून अर्धवट कामे सोडली होती; परंतु आता नव्याने वर्क आॅर्डर देऊन नगरोत्थान योजनेचे फेरनियोजन केले आहे. आताही त्यांना पंधरा महिन्यांची मुदत देण्यात आली असली तरी त्यांना कोणत्याही परिस्थितीत २० नोव्हेंबरपर्यंत काम सुरू करण्यास बजावले आहे. जो ठेकेदार या तारखेपर्यंत काम सुरूकरणार नाही, त्यास प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक आठवड्याला घेणार आढावारस्त्यांची पार चाळण झाल्यानंतर अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. आज या खराब रस्त्यांबाबत एकाच दिवसात दोन बैठका झाल्या. यापुढे ठेकेदार कामे वेळेत सुरू करतो की नाही, कामात सातत्य आहे की नाही, प्रत्येक दिवसागणिक कामाची प्रगती काय आहे, याची तपासणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खास यंत्रणा उभी केली आहे. शिवाय सर्व वरिष्ठ अधिकारी प्रत्येक आठवड्याला कामाचा आढावा घेणार आहेत.
रस्ते डांबरीकरणाला सापडला मुहूर्त
By admin | Updated: November 11, 2014 00:18 IST