येथील नेसरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या कोरोना चाचणी तपासणी केंद्राला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. दोन दिवसांत ५१ जणांनी आपली कोविड-१९ ची अॅन्टिजेन टेस्ट करून घेतली. यामध्ये सातजण बाधित निघाले आहेत. लक्षणे आढळलेल्या इतर चारजणांचे स्वॅब चाचणीकरिता उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज कोविड केंद्राकडे पाठविले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल वसकल्ले यांनी दिली.
सोमवारी (दि. ३) या कोविड चाचणी तपासणी केंद्राची सुरुवात झाली आहे. तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचारासाठी गडहिंग्लजला पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ विक्रम गंधाडे येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करत आहेत.
या तपासणीसाठी यापूर्वी गडहिंग्लज अथवा चंदगड येथे जावे लागत होते, पण आता ही सोय आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांतील मध्यवर्ती केंद्र असलेल्या नेसरी येथे झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
संभाव्य लक्षणे दिसू लागल्यास अंगावर न काढता तत्काळ अॅन्टिजेन टेस्ट करून घ्या, असेही आवाहन डॉ. वसकल्ले यांनी केले आहे.