विश्वास पाटील / कोल्हापूर शिवसेना-भाजपसह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार राजू शेट्टी व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न आहेत. साखरपट्ट्यातील मातब्बर नेत्यांची एकजूट करून किमान ४५ जागा लढविता येतील का, यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीला एकत्र बांधून ठेवणारा नेता नसल्याने शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला विधानसभेच्या २४५ मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने नेते हवेत आहेत. दोन्ही काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. शिवसेना-भाजपनेही तसाच शड्डू ठोकला तरी हे दोन्ही पक्ष युतीतर्फे एकत्रच लढणार हे स्पष्ट आहे. परंतु, मुंडे यांच्या निधनानंतर या दोन्ही पक्षांतील जो समन्वयाचा धागा होता तो आता तुटल्याचे महायुतीतीलच नेत्यांनाही जाणवू लागले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत दुफळी आहेच, शिवाय या दोन पक्षांतील कुरघोडीचे राजकारणही वाढले आहे. त्यामुळेच सांगलीतून भाजपचे नाराज आमदार संभाजी पवार यांच्या मुलाऐवजी नीता केळकर यांना उमेदवारी देण्याचा आग्रह खासदार संजय पाटील यांच्याकडून धरला जात आहे. प्रकाश शेंडगे व सुरेश खाडे यांच्या उमेदवारीवरूनही अशीच रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणूक वेगळी व विधानसभेचे राजकारण वेगळे असते. कारण विधानसभेला स्थानिक राजकारणाचा रंग असतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत किमान शंभराहून जास्त आमदार असे आहेत की, गेली वीस वर्षे त्यांच्याच घराण्यात आमदारकी आहे. तेच लोक सरड्यासारखे रंग बदलून सत्ता मिळवतात. हे बदनाम लोक आहेत हे खरे असले तरी त्यांचा पराभव करणेही सोपे नाही. कोल्हापूरपासून लातूरपर्यंत गेली अनेक वर्षे प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात सातत्याने संघर्ष करणारे नेतेही आहेत. त्यांचा महायुती विचार करायला तयार नाही. परंतु, जे दलबदलू आहेत, त्यांना पुन्हा पायघड्या घातल्या जात आहेत. पर्याय चांगला दिला तरच लोक विश्वास ठेवतात. परंतु, प्रत्यक्षात उलटेच घडत असल्याने शेट्टीही नाराज आहेत. साखरपट्ट्यातील हे नेतृत्व थेट शिवसेना-भाजपची उमेदवारी घेण्यास तयार नाही. कारण त्यांची पाळेमुळे दोन्ही काँग्रेसच्या राजकारणात रूजली आहेत. त्यांना स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून असा काही तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास त्यांची लढण्याची तयारी आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रमुख पक्षांतील नाराज नेत्यांना एकत्र करून काही वेगळेच व्यासपीठ स्थापन करता येईल का, अशा हालचाली सुरू आहेत. ज्यांना दोन्ही काँग्रेसचा कंटाळा आला आहे परंतु शिवसेना-भाजपलाही मतदान द्यायचे नाही, अशा लोकांना हा पर्याय असू शकेल.
राजू शेट्टी देणार तिसरा पर्याय ?
By admin | Updated: July 9, 2014 01:07 IST