लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात अनधिकृत नळजोडणी केलेल्यांवर ५ ते १५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. तरी अनधिकृत नळजोडणी केलेल्यांनी तातडीने जोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी केले आहे. अभय योजनेनुसार ज्यांची जोडणी अनधिकृत आहे; पण नियमित करण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांनी एक हजार रुपये व एक वर्षाची पाणीपट्टी भरून मार्च २०२१ पर्यंत त्यांची जोडणी नियमित करू शकतील. तसेच ज्यांच्याकडे नळजोडणी नाही, त्यांनी १०० रुपये व मार्च २०२१ पर्यंत तीन महिन्यांची पाणीपट्टी भरून नवीन नळजोडणी घेता येईल. नागरिकांना ही संधी जून २०२१ पर्यंत दिली आहे. अनधिकृत नळ जोडणी वापरणे गुन्हा असल्याने ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असेही चोपडे यांनी सांगितले.