कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मोबाईल, गांजा अशा वस्तू कारागृहात पोहोचल्याने तेथील सुरक्षेला बाधा पोहोचली आहे. त्यामुळे भक्कम सुरक्षा व्यवस्था करण्याच्या दृष्टीने कळंबा कारागृह प्रशासनाने जिल्हा नियोजन मंडळाकडे ५० लाखांचा विविध कामांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये कारागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत.
कळंबा कारागृहात मोबाईल, गांजा, बॅटऱ्या आदी साहित्य बेकायदेशीरपणे कैद्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा उलगडा झाला आहे. त्यासाठी परिसरातील अुपरी सुरक्षा साधने, सुरक्षा व्यवस्था कारणीभूत असल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे सुमारे ५० लाखांच्या निधीची मागणी केली आहे. त्याबाबतचा प्रस्तावही सादर केला आहे. या निधीतून कारागृह परिसरात सुमारे ६८ कॅमेरे, १२ हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. सध्या कळंबा कारागृहात ७३ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. नियोजित कॅमेऱ्यांपैकी ३२ कॅमेरे कारागृहातील अंतर्गत हालचालीवर नजर ठेवतील, तर ३६ सीसी कॅमेरे हे कारागृहाबाहेरील घटनांवर लक्ष ठेवतील. या नव्या सुरक्षा व्यवस्थेमुळे कळंबा कारागृह परिसरातील गैरकृत्यांना आळा बसणार आहे.