तानाजी पोवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरकारी काम म्हटल की, लाच दिल्याशिवाय अगर लाच घेतल्याशिवाय कामाची फाईलच पुढे सरकत नाही, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. पण लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे, तरीही सरकारी कार्यालयात ४० ते ५० वयोगटातील कर्मचारी लाच घेण्यात अग्रेसर असल्याचे दिसते. त्यापाठोपाठ सरकारी खात्यातून सेवानिवृत्ती घेण्यापूर्वीही जाता-जाता लाचेचा हात मारणाऱ्यांचीही संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या सव्वादोन वर्षात जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत तब्बल ८९ जण सरकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यामध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावरील २७ सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गेल्या सव्वादोन वर्षात केलेली कारवाई सर्वोत्तम ठरली आहे. जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण ८९ सरकारी कर्मचारी जिल्ह्यात लाच घेताना रंगेहात पकडले. यातील लाचखोरांनी लाचेची रक्कम घेताना २५ खासगी पंटरचा आधार घेतल्याचे आढळले. त्यामध्ये २०१९ मध्ये ४४, तर २०२० मध्ये ३९ सरकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले. विशेष म्हणजे, या दोन वर्षात प्रथमवर्ग दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांवर लाचेची कारवाई करण्यात आली आहे.
महसूल विभाग अव्वल
लाच घेताना झालेल्या कारवाईत जिल्ह्यात महसूल विभाग अव्वल ठरला आहे. गेल्या अडीच वर्षात या विभागाच्या १९ कारवायांत तब्बल १९ सरकारी कर्मचारी, तर ११ खासगी व्यक्ती गजाआड गेल्या. त्यापाठोपाठ पोलीस विभागाचा नंबर लागतो. पोलीस खात्यातील १३ कारवायांत १४ पोलिसांना अटक झाली, तर सात खासगी व्यक्तींचा पंटर म्हणून लाचेसाठी वापर केल्याचे दिसून आले.
तासाभरात निवृत्ती हुकली
आयुष्यभर वन विभागात नोकरी केली. सेवानिवृत्तीचा अखेरचा तो दिवस. सायंकाळी पाच वाजता निवृत्त होणार, म्हणून कार्यालयातील सहकाऱ्यांनी सकाळीच त्यांना निरोपाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला, गोडवे गाणारी भाषणेही झाली. अवघ्या दीड तासात सेवानिवृत्ती होणार होती, तोपर्यंत त्यांच्या हाताला जणू खाज सुटली, अन् लाच घेताना दुपारी साडेतीन वाजता त्या संबंधीत अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हीही घटना याच अडीच वर्षात घडली.
वयोेगट - २०१९, - २०२० - २०२१ - एकूण
२१ ते ३० वर्षे- ०४ - ०९ - ०१ - १४
३१ ते ४० वर्षे -०६ - ०९ - ०१ -१६
४१ ते ५० वर्षे - १८ - ०९- ०२ - ३८
५१ ते ६० वर्षे- १३ - ११ - ०१ - २७
कोट...
लाच घेणारा कर्मचारी असो अगर कितीही मोठा अधिकारी, त्याविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी भयमुक्तपणे पुढे यावे. १०६४ या टोल फ्री फोन नंबरवर फोन करून माहिती कळवावी. लाचेची कारवाई केल्यानंतरही सूडबुध्दीने संबंधीत तक्रारदारांचे काम कोणत्याही परिस्थितीत अडणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.
- आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.