अमर पाटील :
१४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कळंबा तलाव बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम २०१८ पासून रखडले आहे. विशेष म्हणजे कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने या बंधाऱ्याचे तीन वेळा काम करावे लागले आहे. गतवर्षीही पावसाळ्यात तलाव चारवेळा सांडव्यावरून ओसंडून वाहत होता. परिणामी, ताण पडल्याने बंधारा खचला आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच या बंधाऱ्याचे पिचिंग करणे गरजेचे बनले आहे. तलावाच्या मनोऱ्याच्या पूर्वेस असणारा बंधारा आजही सुस्थितीत आहे. मात्र, पश्चिमेकडील बंधारा व त्यावरील पदपथ पूर्णपणे खचला आहे. सुशोभिकरणाच्या कामाअंतर्गत २०१६ मध्ये बंधाऱ्याच्या पिचिंगसाठी तलाव पात्रातील दगड वापरत निकृष्ट काम केल्याने पहिल्या पावसातच बंधारा पूर्ण खचला. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये पिचिंगच्या दुसऱ्यांदा केलेल्या कामात पुन्हा तोच प्रत्यय आला. प्रशासनासह निविदाधारक कंपनीने या कामाकडे कानाडोळा केल्याने वारंवार पिचिंग करण्याची वेळ आली. डिसेंबर २०१७ मध्ये खोबणीचे दगड वापरत पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिसऱ्यांदा पिचिंग करण्यात आले. मात्र, घाईगडबडीत उरकण्यात आलेले हे पिचिंग पावसाळ्यात दीड फुटाने खचले. त्यानंतर केलेल्या कामाची बिले पालिकेने अदा न केल्याने निविदाधारक कंपनीने गाशा गुंडाळला. त्यामुळे पिचिंगचे काम कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
...तर बंधाऱ्याला धोका
गतवर्षी चारवेळा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहत होता. बंधाऱ्यावर याचा मोठा ताण पडला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहात पाचगावकडे जाणारा लहान पूल वाहून गेला होता, तर पाटबंधारे विभागाने बांधलेला मोठा पूल खचत असल्याचा अनुभव आहे. पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न निकाली न काढल्यास बंधाऱ्याला धोका होण्याची भीती आहे.
फोटो : २४ कळंबा तलाव पिचिंग
ओळ :
कळंबा तलाव बंधारा दोन फुटाने खचला आहे. तलावाच्या अस्तित्वास याचा मोठा धोका असून पावसाळ्यापूर्वी याचे पिचिंग करणे गरजेचे आहे.