लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेतील खात्यांची चौकशी सुरू असल्याने पेन्शन थांबविली होती; मात्र आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन वर्ग होणार आहे. आयकर नोटिसीसह इतर कारणानी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची तहसीलदारांनी शहानिशा करायची आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. मात्र, यामध्ये चुकीची माहिती भरून पेन्शनचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाच्या वतीने सर्वच खात्यांची तपासणी करण्यात आली. त्यात आयकर विभागाने आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादीच दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानुसार पैसे जमा करण्यासाठी शासनाने ८ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यामध्ये जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी अडीच कोटी रुपये शासनाला परत केले. वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याने पात्र शेतकऱ्यांचीही पेन्शन थांबविली होती. आता प्रक्रिया पूर्ण झाल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन वर्ग होणार आहे.
आयकर नोटिसीसह इतर कारणाने अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर दिली होती. खरोखरच तो शेतकरी आयकर परतावा भरतो का? याची खातरजमा करायची होती. त्यात अपात्र ठरतील त्यांच्याकडून वसुली करायची आणि पात्र ठरणार त्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्याच्या सूचना आहेत.
- राजाराम लोंढे