संतोष पाटील- कोल्हापूर -वाहतूक कायद्यात न बसणाऱ्या वाहनास सांकेतिक भाषेत ‘पास’ देऊन २४ तास शहरात कुठेही, कसेही बिनदिक्कतपणे फिरण्याची ‘एंट्री’ पोलिसांकडूनच दिली जात आहे. संपूर्ण शहरात शिस्तीच्या नावाखाली दिवसभर ‘राबत’ असलेल्या या यंत्रणेने वरकमाईचे मोठे मजले रचले आहेत. विशेष म्हणजे वरिष्ठांची नजर चुकवीत पोलीस कर्मचाऱ्यांनी तयार केलेली ही साखळी थक्क करून सोडणारी आहे. खासगी प्रवासी वाहतूक गाड्या, विनापरवाना रिक्षा व जीप, नियम तोडणाऱ्या विद्यार्थी वाहतूक बसगाड्या, ओव्हरलोड व मल्टीअॅक्सल ट्रक, आदींचा कायद्याच्या नाकावर टिच्चून शहरात प्रवास सुरू आहे व त्यांचा हा प्रवास सुकर करण्यासाठी पोलिसांचीच एक टोळी कार्यरत आहे. मार्केट यार्ड येथे चिठ्ठीद्वारे पास देऊन वाहनांकडून पैसे उकळले जात असल्याची घटना एका वाहनधारकाने उघडकीस आणली. ही चिठ्ठी संबंधिताने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना ‘वॉटस्अॅप’वर पाठविली. पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. आर. पाटील यांना नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्याचे तातडीने आदेश दिले. पाटील यांनी साहाय्यक निरीक्षक रमेश खुणे तत्काळ मार्केट यार्ड येथे पाठविले. याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या टोळक्याने अपघाताची बातमी समजल्याने येथे आल्याचा खुलासा केला. मात्र, त्यांनी दिलेल्या त्या ‘चिठ्ठी’चा फोटो दाखविताच संबंधितांचे धाबे दणाणले. खुणे यांनी संबंधितांना समज देऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.जोतिबा व अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने परजिल्ह्यातील व राज्यातील पर्यटक व भाविक जिल्ह्यात येत आहेत. जिल्हा सोडून दुसऱ्या क्रमांकाची गाडी दिसली की ‘शिट्टी’ वाजलीच म्हणून समजायची! अशा शिट्ट्या घालणाऱ्यांकडे लगेच संबंधित वाहनचालक धावत जाऊन तोडपाणी करतो. त्याला लगेच सांकेतिक भाषेतील ‘कार्ड’ सोपविले जाते. हा प्रकार राजरोजपणे सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व आर. आर. पाटील यांची प्रतिमा अत्यंत विश्वासार्ह असूनही त्यांचे कनिष्ठ मात्र त्यांच्या उद्दिष्टांना हरताळ फासताना दिसत आहेत. अशी होते चिठ्ठीच्या पासची प्रक्रिया‘मार्शल’च्या नावाखाली चार-पाच पोलिसांचे टोळके चौकात उभे असते. वाहतूक कायद्यात न बसणारे सावज पद्धशीरपणे हेरले जाते. सुरुवातीस संबंधित वाहनधारकाने कायद्याचे उल्लंघन करीत केलेल्या चुकांचा पाढा वाचला जातो. यानंतर कायदेशीर कारवाईच्या भीतीने हबकलेल्या सावजाकडून ‘तोडपाणी’ची भाषा सुरू होते. १०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत हा व्यवहार ठरतो. यानंतर पावती म्हणून संबंधिताला साध्या कागदावर सांकेतिक भाषेत लिहिलेली चिठ्ठी दिली जाते. यावर त्या वाहनाचा क्रमांक व दिनांक नोंदविलेला असतो. ही चिठ्ठी म्हणजे शहरात पुढील २४ तासांत कुठेही फिरण्याचा जणू मुक्त परवानाच असतो! दुसऱ्या कोणी वाहतूक पोलिसाने अडविल्यास फक्त चिठ्ठी दाखवायची. बस्स...! यानंतर कोणीही वाहतूक कायद्याची भीती दाखविणार नाही, अशी हमीच ही चिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे.वरकमाईचे ‘हॉट स्पॉट’पोलिसांसह आरटीओंच्या डोळेझाक पद्धतीमुळे शहराची वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे. शहरातील अत्यंत गजबजलेली स्टेशन रोड ते ताराराणी चौक, मध्यवर्ती बसस्थानक व महालक्ष्मी चेंबर्स परिसर, भवानी मंडप, रंकाळा स्टॅँड परिसर, शिरोली, शिवाजी विद्यापीठ, फुलेवाडी, शिवाजी पूल ही शहरातील प्रवेशद्वारे शहर पोलिसांसाठी वरकमाईचे ‘हॉट स्पॉट’च आहेत. ५वाहनधारकांच्या अडवणुकीचे प्रकार घडल्याची तक्रार आल्यास तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा स्वरूपाच्या अडवणुकीचे प्रकार समजल्यास नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी थेट संपर्क साधावा. - आर. आर. पाटील निरीक्षक, शहर वाहतूक शाखावरकमाईचे कुरण विनापरवाना जीप व रिक्षा - २५००बेशिस्त, रस्त्यावर थांबणाऱ्या लक्झरी गाड्या - २०० मल्टीअॅक्सल व ओव्हरलोड वाहने - १२००दररोज रस्त्यावर पार्किंग होणारी २० हजारांहून अधिक लहान-मोठी वाहनेकोल्हापुरातील शहर वाहतूक शाखेतर्फे अशा प्रकारे एंट्री पासचे वाटप सुरू आहे.
शहर पोलिसांचा ‘एंट्री’साठी ‘पास’
By admin | Updated: April 27, 2015 00:19 IST