तालुक्यातील पोलीस यंत्रणेने गावांगावात जाऊन एक गाव, एक गणपतीचे प्रबोधनात्मक आवाहन केले होते. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक मंडळांनी गणेशाचे आगमन साध्या आणि प्रशासनावर घालून दिलेल्या नियमांचे पालन करून केले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या विविध रूपातील लाटेचे संकट अधिकच गडद असताना महापुराने त्यात आणखी चिंता वाढवली आहे. गेले दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने आणि आरोग्यदायी साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला बहुतांशी मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. गणरायाचे आगमन, पूजा-अर्चा, देखावे, विसर्जन मिरवणुका गर्दी टाळूनच करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील कोणत्याही गावाने अथवा मंडळाने गर्दी घडण्यासारखे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. साउंड सिस्टिम, झगमगाट, विद्युत रोषणाई यासारख्या भपकेपणाला फाटा देऊन तालुक्यातील गणेशोत्सव आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक साजरा होत आहे.
चौकट
पन्हाळा पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ५६ गावांपैकी ५ गावांत, कोडोली पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ३० गावांपैकी ४ गावांत, कळे पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ५४ गावे आणि २२ वाड्या-वस्त्यांपैकी २३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ गणेशोत्सव साजरा केला आहे.
प्रतिक्रिया
गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांसाठी प्रशासनाने बनविलेल्या आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यातून कोणी नियम मोडून गर्दीसारखे कार्यक्रम अथवा मिरवणुका काढल्या, तर त्या मंडळावर कारवाई करण्यात येईल. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी व्हावा. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन पन्हाळा पोलिसांनी केले आहे.
अरविंद काळे, पोलीस निरीक्षक, पन्हाळा पोलीस ठाणे