कोल्हापूर : पोलिसांसाठी आवश्यक वाहनांची तत्काळ खरेदी करा. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी रुपये वापरा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे पोलिसांना वाहनांची भेट मिळाली.येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या शासकीय कामांच्या आढावा बैठकीत पवार यांनी जिल्ह्यातील पोलिसांना वाहने मिळाली का? पुरेशी वाहने आहेत का? यावेळी निधी नसल्याने वाहने खरेदी रखडले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी मी बैठकीत बोलत आहे ते आदेश समजा. पोलिसांसाठी आवश्यक वाहनांची तत्काळ खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी रुपयांची तरतूद करा, असे सांगितले.दरम्यान, जिल्हा पोलीस दलाकडे सध्या लाईट व्हॅन व सुमो, जीप, कार, बोलेरो व व्हॅन, जिप्सी, बुलेट प्रुफ, पी. सी. व्हॅन (बस), क्वॉलिस, ट्रक, मोटारसायकल, तवेरा, वज्रगार्ड अशी एकूण २७६ वाहने आहेत. आणखीन ४१ वाहनांची पोलीस दलाला गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी सादर केला. त्यातील दोन वाहने पोलीस दलाला मिळाली आहेत. दरम्यान कोल्हापूर विमानतळावर सकाळी पावणेनऊच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार यांचे आगमन झाले. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन राऊत होते. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील, महापौर सुनिता राऊत आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, अशोक स्वामी, नगरसेवक राजेश लाटकर, परीक्षित पन्हाळकर आदींसह कार्यकर्ते, शासकीय अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय विमानतळ पतन प्राधिकरणाने सुरक्षिततेच्यादृष्टीने दिलेल्या सूचनेनुसार पवार पोलीस दलाकडून विमानतळ कार्यालयासमोरील आवारात सलामी दिली. पूर्वी ती विमानतळावरच दिली जात होती. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आगमनानंतर कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे विमानतळावर आगमन झाले. तेथून ते वाळवा येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. (प्रतिनिधी)
पोलीस वाहनांसाठी एक कोटी
By admin | Updated: July 16, 2014 01:00 IST