कोल्हापूर : येथील रविवार पेठेतील एका वृद्धाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. बाळासाहेब गणपतराव संकपाळ (वय ६८, रा. ९४४, बी वॉर्ड, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाळासाहेब संकपाळ हे रविवारी दुपारी जेवण करून दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन झोपले. दुपारी साडेचार वाजता चहा घेण्यासाठी खालच्या मजल्यावर ते आले नसल्याने त्यांचा मुलगा नीलेश संकपाळ (वय ३४) यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन खोलीचा दरवाजा ठोठावला; पण तो आतून बंद होता, त्याने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून काढला असता, वडील बाळासाहेब संकपाळ यांनी छताच्या पंख्याला दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.