प्रदीप शिंदे - कोल्हापूर -कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने बसस्थानकाचे इन-आउटगेट बदलण्याचा पर्याय जिल्हा प्रशासनास दिला आहे. सध्याच्या स्थानकावरील प्लॅटफॉर्मची स्थिती, गाड्या दुरुस्तीसाठी असणारा डेपो, प्रवासी उतरण्यासाठी असणारी जागा लक्षात घेऊन महामंडळाकडून या प्रस्तावास विरोध होण्याची शक्यता आहे.शहरातील वाहतुकीच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत मध्यवर्ती बसस्थानकाचे इन व आउट गेट बदलण्याबाबत मुद्दे उपस्थित केले गेले. या बसस्थानकाचे इन व आउट गेट बदलण्याबाबत यापूर्वीही अनेकवेळा प्रयोग करून पाहिले आहेत. यामध्ये मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यापेक्षा वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला होता. तसेच एसटी प्रवाशांची गैरसोयही झाली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी फुटण्यापेक्षा गैरसोय अधिकच दिसून आली होती. प्रामुख्याने मध्यवर्ती बसस्थानकाच्या विभागीय कार्यालयाच्या बाहेरील ‘केएमटी’चा बसथांबा हलविल्यास ही वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल, असे एस. टी. प्रशासनास वाटते. तसेच इन-आउट गेट बदलल्यास मध्यवर्ती बसस्थानकाचा संपूर्ण आराखडा बदलावा लागणार आहे.
इन-आउट गेट बदलण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: December 15, 2014 23:56 IST