संतोष पाटील ल्ल कोल्हापूरतलाठी नाही...मंडल अधिकारी कामात आहेत...तहसीलदारांना वेळ नाही...प्रांत सुनावणीत व्यस्त आहेत...भूमापन अधिकारी रजेवर आहेत...आदी कारणांमुळे मिळकतींबाबतची रखडणारी कामे आता एका विशिष्ट वेळेत पूर्ण होणार आहेत. कार्यालयीन खाबूगिरीला चाप बसविण्यासाठीच राज्य शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास आॅगस्ट २०१४पर्यंत सर्व तालुके ई-चावडी व ई-फेरफारद्वारे आॅनलाईन करण्याची डेडलाईन दिली आहे. पहिल्या टप्प्यात चंदगड तालुक्यातील मिळकती ‘क्लिक’वर येणार आहेत. राज्याचे महसूल अप्पर सचिव यांनी १३ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील ई-चावडी व ई-फेरफारबाबत राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास १९ मेपर्यंत जिल्ह्यतील किमान एक पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान केंद्र यांच्याकडील सर्व्हरवर होस्ट करून १ जूनपासून आॅनलाईन करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा प्रशासन अद्याप तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यापर्यंतच अडकले आहे. उद्या, शनिवारी याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात चंदगड तालुका आॅनलाईन केला जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हे कोणत्याही परिस्थितीत १ आॅगस्ट २०१४ पासून ई-चावडी व ई-फेरफार आॅनलाईन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आता मिळकती ‘क्लिक’वर
By admin | Updated: June 7, 2014 00:54 IST