चंदगड
: बिगर हंगामी रताळी काढणीचे काम तुडये-हाजगोळी भागात सुरू असून इतर शेतीकामांबरोबरच या कामात शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेषत: रताळी हे पीक पावसाळ्यात घेतले जाते. पण तुडीये-हाजगोळी भागात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी रताळी लागवड केली जाते. याचा फायदा झाल्याचे लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी या वेगळ्या प्रयोगाचे अनुकरण केले आहे.
त्यामुळे सध्या या भागात अनेक शेतकरी उन्हाळी रताळी काढणीच्या कामात व्यस्त आहेत.
एरव्ही रताळी लागवड पावसाळ्यात केली जाते. पण, गेल्या काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणाचा फटका या पिकाला बसून त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. या भागाजवळ जंगल असल्याने हत्ती, गवे यांच्या दाढेतून रताळी पिकाला बाहेर काढणे मुश्कील झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे पीकच घेणे बंद केले होते. मात्र, उन्हाळी रताळी लागवड फायद्याची होत आहे हे लक्षात येताच बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
गेल्या काही दिवसांनतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. याचा अडथळा मात्र रताळी काढताना होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बिगर हंगामात रताळी पिकाची आवक कमी असते. त्यामुळे बाजारात आलेल्या मालाला चांगला भाव मिळतो. सध्या १५०० ते २००० रुपये क्विंटल असा भाव सुरू आहे.
रताळी प्रक्रिया उद्योग गरजेचा
तुडीये - हाजगोळी भागासह तालुक्यातील बऱ्याच भागात कमी जास्त प्रमाणात पावसाळ्यात रताळी लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात होते. उत्पादित शेतीमाल जवळच्या बेळगाव बाजारपेठेत नेला जातो. पण त्या ठिकाणी कधी शेतीमालाचा कमी दर्जा तर कधी आवक जास्त असून शेती माल खरेदीदार नसल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडण्याऐवजी निराशाच पडते. त्यातच अडत व्यापाऱ्यांचे कमिशन यामुळे शेतकरी घाईला आला आहे. शेतकऱ्यांचीही पिळवणूक थांबविण्यासाठी तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रताळी प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहे.
रताळी हे खुळे पीक..!
आमच्या भागात उन्हाळी रताळी लागवड प्रयोग आमच्यासह अनेकजण करत आहेत. पण हे पीकच खुळे असून सजले तर चार पैसे पदरात पडतात. नाही तर केलेला खर्चही अंगलट येतो. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात पण उन्हाळी रताळी लागवडीमुळे फायदा होत असल्याचे मत, 'लोकमत'शी बोलताना तुडये येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग गोडसे यांनी व्यक्त केले.
फोटो ओळी : वेल काढल्यानंतर रताळी काढणी केली जाते.
क्रमांक : ११०७२०२१-गड-०३