कोल्हापूर : चंदीगडमध्ये आंतरविद्यापीठीय ॲथलेटिक्सच्या स्पर्धामध्ये मी सहभागी होते. ॲथलेटिक्समधले लिजेंड मिल्खा सिंग पॅव्हेलियनमध्ये उपस्थित असल्याचे दिसल्यावर मी मैत्रिणीसमवेत त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या पायाजवळ बसून छायाचित्र काढण्याची विनंती केली; पण त्यांनी ‘लगेच नही नही बच्ची, यहाँ नही पास बैठो’ असे म्हणत नुसते फोटोच काढू दिले नाहीत, तर कुठून आलात, काय खेळताय अशी आपुलकीने विचारपूसही केली. त्यांच्या डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्वाची छाप अजूनही मनावर कोरली गेली आहे.
मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त ऐकल्यानंतर त्यांना भेटलेल्या राष्ट्रीय धावपटू असलेल्या आदिती सोहनी या कोल्हापूरच्या कन्येने २६ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळचे त्यांच्याविषयीचे भारावलेपण आजही कायम आहे. त्यामुळेच त्यांच्या जाण्याचे वृत्त ऐकून मनात कालवाकालव झाल्याचे आदिती आवर्जून सांगतात.
संभाजीनगरमधील आदिती देशपांडे सोहनी या सध्या जिम चालवतात. वयाच्या १८ व्या वर्षी शहाजी कॉलेजमध्ये शिकत असताना १९९५ मध्ये आंतरविद्यापीठीय ॲथलिट स्पर्धेच्या निमित्ताने त्या चंदीगडला गेल्या होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये त्या होत्या. या स्पर्धेदरम्यान पॅव्हेलियनमध्ये मिल्खा सिंग येऊन बसल्याचे दिसले. एक धावपटू म्हणून लहानपणापासून त्यांच्याविषयी ऐकले असल्याने प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची संधी मिळाली आहे म्हटल्यावर मी वेगाने त्यांच्याकडे धाव घेतली, हे सांगताना आजही आदिती तेवढ्याच उत्साहाने ती भेट स्मरतात. त्या सांगू लागतात, मी त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले. त्यांच्या सोबत एक छायाचित्र घेऊ या म्हणून मी पायाजवळ जाऊन बसले. यावर लगेच मिल्खा सिंग यांनी ‘नही नही बच्ची, यहाँ नही, पास बैठो’ असे सांगत सिंग यांनी पत्नीसोबत मधे बसवून छायाचित्र काढू दिले व आस्थेने विचारपूस करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
चौकट
अशीही एक आठवण
कोल्हापुरात परत आल्यानंतर मिल्खा सिंग यांच्यासमवेतचे छायाचित्र मी घरात दाखविले; पण माझ्या काकींनी ‘हा कोण सरदार, असे म्हणत चिडवल्याने मी ते छायाचित्र माझ्या आठवणीच्या कप्प्यात लपवून ठेवले. यानंतर ‘भाग मिल्खा भाग’ हा फरहान अख्तर यांचा मिल्खा सिंग यांच्यावरील जीवनपट लोकप्रिय झाल्यानंतर ते छायाचित्र मी जिममध्ये फ्रेम करून लावले.
फोटो: १९०६२०२१-कोल- मिल्खा सिंग सोहनी