हुपरी : गेल्या पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळापासून हुपरी शहर व परिसरातील आठ ते दहा गावांबरोबरच कर्नाटक सीमाभागातील गोरगरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून देत त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण देण्यामध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाला सध्या विद्यार्थीच मिळेना झालेत. या विद्यालयात सर्वांत जास्त आवश्यक त्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध असूनसुद्धा विद्यार्थी मिळत नाहीत ही दुर्दैवी घटना सध्या पहावयास मिळत आहे. परिणामी या शैक्षणिक वर्षी पाचवीचा वर्ग बंद पडण्याच्या मार्गांवर आहे.
हळूहळू त्याचा इतर वर्गावरही मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
सर्व सोयीसुविधांयुक्त अशा या विद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यास पालक का पुढे येत नाहीत?या नामांकित शाळेकडे पालक का पाठ फिरवत आहेत?अशी परिस्थिती का निर्माण होत आहे ?याचा अभ्यास व आत्मचिंतन येथील शिक्षक, स्थानिक सल्लागार समितीबरोबरच रयत शिक्षण संस्थेनेही करण्याची गरज आहे.
साधारण पंच्याहत्तर वर्षांपूर्वी हुपरी परिसर व कर्नाटक सीमाभागात कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. परिणामी सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबांतील मुलांना शिक्षण मिळणे अवघड होते. शिक्षणाअभावी अनेक मुलांचे भविष्य अंधकारमय झाले होते. गोरगरीब कुटुंबांतील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यासाठी स्वर्गीय पारिसाण्णा इंग्रोळे यांनी थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे प्रयत्न करून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय सुरू केले. आज या शिक्षण संकुलात पदवीपर्यंतच्या शिक्षणाबरोबरच सर्व प्रकारचे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध आहे. भव्य व प्रशस्त अशा इमारतीसह सर्व सुविधांयुक्त अशी अद्ययावत प्रयोगशाळा ब भव्य क्रीडांगणही उपलब्ध आहे. या शाळेला प्रशस्त अशा २४ खोल्यांसह क्रीडांगणही आहे. मात्र, या ठिकाणी केवळ २७५ च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा गेल्या काही वर्षांपासून बंद पडण्याच्याच मार्गावर आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या शाळा इमारतीच्या सहा खोल्या जिल्हा परिषदेने नगरपरिषद कार्यालयासाठी भाड्याने दिल्या आहेत. दुर्दैवाने असाच काहीसा प्रकार या विद्यालयाबाबत घडण्याची शक्यता आहे.
फोटो ओळी-हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील सर्वसामान्य व गोरगरीब विद्यार्थांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून देत त्यांचे भविष्य बदलवणारी ती हीच शाळा.